फोन करून दिली बाँम्ब ठेवल्याची खोटी माहिती, मुंबईत पोलिसांचं सर्च ऑॅपरेशन

मुंबई

मुंबई आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे दिल्ली स्पेशल सेलनं केलेल्या कारवाईत आरोपीच्या चौकशीतून पुढे आले असताना आता आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून बाँम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. आझाद मैदान परिसरातील एका इमारतीत हा बाँम्ब ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑॅपरेशन राबवले मात्र संशयास्पद काही आढळून आले नाही. या प्रकरणी खोटी माहिती दिल्या प्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

चार दिवसांपूर्वी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर काल मुंबईमध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने तशी माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचं समजतंय. या इशार्‍यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!