उत्तर प्रदेशाची सत्ता काबिज केल्यास ‘आप’ 24 तासांत 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार

लखनौ

उत्तर प्रदेशमधील राजकारण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापायला लागले आहे, या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आज आम आदमी पार्टीने देखील याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. पत्रकारपरिषदेत याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. जर आम आदमी पार्टीचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले, तर राज्यातील जनतेला 300 यूनिट मोफत वीज दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

मनीष सिसोदिया यांनी याबाबत टिवट देखील केले असून त्यामध्ये ते म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना अवास्तव वीज बिलांपासून मुक्ती देण्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा..आम आदमी पार्टीचे सरकार आल्याच्या 24 तासांत प्रत्येक व्यक्तीस घरगुती वापरासाठी प्रत्येक महिन्याला 300 यूनिट पर्यंत मोफत वीज मिळेल. याशिवाय जुने वीज बील माफ, प्रत्येक घरी 24 तास वीज, शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याचे देखील आश्वासन आम आदमी पार्टीकडून देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!