टाईमच्या 100 प्रभावशाली व्यक्ती यादीत तालिबानी बरादर
नवी दिल्ली,
दरवर्षी प्रमाणे यंदाही टाईम मॅगेझीनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली असून त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बरोबरच तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर याचाही समावेश असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत कमला हॅरीस, सिरमचे प्रमुख अदार पूनावाला, चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग, ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल, इस्रायलचे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट, इराणचे राष्ट्रपती इब-ाहीम रईसी आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचाही समावेश आहे.
तीन वर्षांपूर्वी तुरुंगातून सुटलेला तालिबानी नेता अब्दुल गनी बरादर 20 वर्षे चाललेल्या अफगाणी युद्धातील निर्विवाद विजेता मानला जातो. तालिबानची कोणत्याही देशांशी चर्चा करण्याची जबाबदारी बरादर यानेच पार पाडली आहे. मोहम्मद उमर आणि बरादर यांची दोस्ती लहानपणापासूनच होती. बरादरच्या तारुण्याचा कालावधी म्हणजे अफगाणी निरंतर संघर्षाची कहाणी आहे. 1969 साली उरुजगान प्रांतात जन्मलेला बरादर सुरवातीपासूनच कट्टर धार्मिक इस्लामी मानला जातो. 1980 च्या दशकात सोविएत संघ विरुद्ध अफगाण मुजाहिद्दीन लढाईत त्याने मर्दुमकी गाजविली होती. 1992 मध्ये रशिया अफगाणीस्थान मधून बाहेर पडल्यावर त्याने मेव्हणा मुल्ला उमर याच्यासह कंधार मध्ये मदरसा सुरु केला तेव्हापासून ते सतत एकत्र आहेत.
या दोघांनी मिळून तालिबानची स्थापना केली. या संघटनेची सुरवात शांतीपूर्ण होती मात्र पाकिस्तानी आयएसआयच्या चेतावणीने ही संघटना हिंसक बनली. त्यांनी अफगाणिस्थानवर कब्जा करून तेथे इस्लामिक अमिरात स्थापन केली त्यात बरादर हाच हिरो बनला होता.