महावितरणच्या जयसिंगपूर विभागाकडून महापूरात बाधित 889 रोहित्रांवरील कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत

कोल्हापूर,

महावितरणच्या जयसिंगपूर विभागात महावितरणच्या कर्मचार्‍यांनी युध्दपातळीवर काम करत महापुराच्या काळात जमीनदोस्त झालेली 889 विद्युत वितरण रोहित्रांची उभारणी करून 7 हजार 600 कृषीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी पार पाडली आहे.

कोल्हापूर जिल्हयात महापुरामुळे नदीकाठी असणार्‍या महावितरणच्या विद्युत यंत्रणेला मोठा फटका बसला. वीज खांब, रोहित्रे जमिनदोस्त झाल्याने तसेच वीज तारा तुटल्याने बहुतांश कृषीपंप वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. कोल्हापूर मंडळांतर्गत असणार्‍या जयसिंगपूर विभागास महापुराचा मोठ्याप्रमाणात फटका बसला असून 1127 विद्युत रोहित्र, 457 उच्चदाब वीज खांब, 1969 लघुदाब वीज खांब नादुरूस्त झाले होते. महावितरण कर्मचार्‍यांनी कसरत करून 889 विद्युत रोहित्र, 401 उच्चदाब वीज खांब, 1574 लघुदाब वीज खांब उभारुन कृषीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला यश मिळविले आहे. चिखल – गाळ, पुराचं पाणी असल्याने वाहने जाणे शक्य नसल्याने कावड करून कर्मचार्‍यांनी विद्युत वितरण रोहित्रांची वाहतूक केली. वीजग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण सदैव दक्ष आहे. त्याचा प्रत्यय जयसिंगपूर विभागातील कर्मचार्‍यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेल्या प्रयत्नातून येतो.

विशेष बाब म्हणजे, महापूराने बाधित झालेला जयसिंगपूर नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजनेसह शहर व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत केल्याबद्दल आरोग्य व कुटूंबकल्याण, वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा.ना.श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महावितरणच्या कामाचे कौतुक केले आहे.

अधीक्षक अभियंता श्री.अंकुर कावळे यांचे मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वैभव गोंदील व विभागातील सर्व अधिकारी -कर्मचार्‍यांनी महापूराने बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी पुर्ण केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!