सोनू सूद आयकर छाप्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपात आरोप प्रत्योरापांच्या फैरी
मुंबई,
सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाकडून गेल्या दोन दिवसापासून धाडसत्र सुरू आहे. मात्र सोनू सूद यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरचं सोनू सूद केंद्र सरकारच्या रडारवर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी केला आहे. सोनू सूद यांची वाढती लोकप्रियता, तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेला आम आदमी पक्षासोबत सोनू सूद यांची वाढती जवळीकता पाहून केंद्र सरकारने आयकर विभागाला हाताशी धरून या धाडी घातल्या असल्याचा खळबळजनक आरोप संजय तटकरे यांनी केला आहे.
कारवाईबाबत विरोधकांचा दुटप्पीपणा – राम कदम
देशामध्ये जेथे चुकीचं घडत आहे, तिथे तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. मात्र देशभरातील विरोधी पक्ष दुटप्पी भूमिका घेत असून राज्य सरकारच्या तपास यंत्रणा कारवाई करत असतील तर त्या कारवाया योग्य आहेत, पण केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेने कारवाई केली तर अयोग्य अशी दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.