साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर… ; मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी
मुंबई,
प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटील याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेता साहिल खान याच्या दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे मनोज याने पत्रात लिहिले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता यामध्ये मनसेने देखील मनोज याला पाठिंबा दिला आहे. 20 सप्टेंबरला साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर त्याला त्या पद्धतीनेच इशारा देण्यात येईल, असे मनसेने म्हटले आहे. बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास मनोज पाटील याच्या मित्रांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी दिला आहे.
मनोज पाटील याने ’मिस्टर इंडिया’ हा किताबदेखील जिंकला आहे. मनोज याने 16 सप्टेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी गोळ्या खाऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटील याने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मनोज याने याविरोधात आधीदेखील पोलीस तक्रार केली होती. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग-ामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोज याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला होता.
साहिल खान हा चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि युट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.