कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाचे पंतप्रधान 16 सप्टेंबरला उद्घाटन करणार
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 सप्टेंबर 2021 ला सकाळी 11 वाजता कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाला भेट देऊन लष्कर, नौदल, हवाई दल आणि नागरी अधिकार्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. त्यानंतर उपस्थिताना ते संबोधित करतील.
नव्या संरक्षण कार्यालय संकुलाविषयी
नव्या संरक्षण कार्यालय संकुलात, संरक्षण मंत्रालय आणि लष्कर, नौदल, हवाई दलासह सशस्त्र दलांचे 7000 अधिकारी सामावले जाणार आहेत. ही इमारत आधुनिक, सुरक्षित आणि कार्यात्मक स्थान पुरवणार आहे. इमारतीच्या कार्य व्यवस्थापनासाठी त्याचबरोबर दोन्ही इमारतींच्या संपूर्ण सुरक्षा आणि देखरेखीसाठी एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे.
नवे संरक्षण कार्यालय संकुल उर्जा समृध्द आणि समावेशक सुरक्षा व्यवस्थापन उपायांनी समृध्द आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे एलजीएसएफ (लाईट गॉज स्टील फ्रेम) म्हणून ओळखले जाणारे नवे आणि शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे पारंपारिक आरसीसी बांधकामाच्या तुलनेत बांधकामाचा काळ 24-30 महिन्यांनी कमी होतो. संसाधन समृध्द हरित तंत्रज्ञानाचा वापर इमारतीसाठी करण्यात आला असून पर्यावरण स्नेही पद्धतींना इथे प्रोत्साहन देण्यात आले आहे.
संरक्षण मंत्री, गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, गृह निर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री, चीफ ऑॅफ डिफेन्स स्टाफ आणि सशस्त्र दलाचे प्रमुख या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील.