श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसीथ मलिंगाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा
मुंबई,
यॉर्कर किंग अशी ओळख असलेला श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मलिंगाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून पूर्वीच निवृत्ती घेतली होती. मलिंगाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका पोस्टद्वारे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
लसीथ मलिंगाने श्रीलंकेसाठी 30 कसोटी सामने, 226 एकदिवसीय आणि 84 टी -20 सामने खेळले. ज्यात त्याने 546 विकेटस घेतल्या. मलिंगाने शेवटचा टी -20 सामना मार्च 2020 मध्ये पल्लेकेले येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. मलिंगाने 2011 मध्ये कसोटी आणि 2019 मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या वर्षी जानेवारीमध्ये मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सने रिलीज केलं होतं. मलिंगा टी -20 मध्ये 100 विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे.
मलिंगाने टवीट करत म्हटलं की, मी माझे टी-20 चे शूज आता टांगून ठेवत आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून मी निवृत्ती घेत आहे. माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत मला साथ दिलेल्या सर्वांचा आभार मानतो. येणार्या काळात युवा क्रिकेटपटूंसोबत माझे अनुभव शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. मी श्रीलंका क्रिकेट बोर्ड, मुंबई इंडियन्स, मेलबर्न स्टार्स, केंट क्रिकेट क्लब, रंगपूर रायडर्स, गुयाना वॉरियर्स, मराठा वॉरियर्स आणि मॉन्ट्रियल टायगर्स यांचे आभार मानतो.