’भारताची लेक’ म्हणून घ्यायची लाज वाटतेय; रिलेशनशिपच्या अफवांवर मुनमुन दत्ताची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई

तारक मेहता का उल्टा चष्मा’बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. त्यावर आता मुनमुन दत्ताने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. आपल्या विनोदामुळे स्त्रियांना सातत्याने शरमेने मान खाली घालावी लागते, आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय असा संताप मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे.

मुनमुन दत्ताने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिने अशा प्रकारच्या बातम्या देणार्‍या माध्यमांना उपदेशाचा डोस दिला आहे. ती म्हणते की, ‘बातम्यांच्या नावाखाली आपल्या कल्पित कथांची राळ उडवत कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यात, तिच्या समंतीशिवाय डोकावण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिलाय? एखाद्या स्त्रीने नुकतंच आपलं प्रेम गमवलंय किंवा आपला मुलगा गमावलाय, तिच्या चेहर्‍यावरून तुम्ही कॅमेराही हटवत नाही, हे केवळ टीआरपीसाठी. तुम्हाला हव्या तशा बातम्या देता आणि एखाद्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवता. अशा प्रकारे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे‘.

आपल्या दुसर्‍या पोस्टमध्ये मुनमुन दत्ता लिहिते की, ‘मी आपल्याकडून चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमधील लोकांच्या ईल कमेंट पाहिल्यानंतर, म्हणजे सुशिक्षित समजल्या जाणार्‍या लोकांनीही अशा प्रकारच्या कमेंट केल्यानंतर आपला समाज कसा मागे वाटचाल करतोय हे लक्षात येतंय. स्त्रीवर सातत्याने तिच्या वयावरुन आणि इतर गोष्टीवरुन प्रत्येकाकडून आपापल्या कुवतीनुसार कमेंट केल्या जातात. आपल्या कमेंटवरुन एखाद्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय याची कुणाचाच चिंता नाही. एखाद्याचे 13 वर्षाचे करियर अवघ्या 13 मिनीटात धुळीस मिळवलं जातं. त्यामुळे एखादा व्यक्ती नैराश्यात गेला किंवा आपले जीवन संपवण्याचा विचार करत असेल तर तुम्ही थोडं थांबा आणि विचार करा की आपल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली असेल का. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय‘.

तेरा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये मुनमुन दत्ता सुरुवातीपासूनच मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी ‘टप्पू’चे पात्र अभिनेता भव्य गांधी यांनी साकारले होते. मात्र, 2017 मध्ये भव्यने हा शो सोडल्यानंतर राजने टप्पूची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

मुनमुन बराच काळ शोमधून गायब होती, पण काही दिवसांपूर्वीच ती शोमध्ये परतली. वास्तविक, मुनमुन तिच्या एका व्हिडीओवरून वादात अडकली होती, त्यानंतर तिने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. या वादानंतर, मुनमुन शोमध्ये दिसली नाही, त्यानंतर प्रेक्षकांना वाटले की तिने शो सोडला आहे. परंतु, अलीकडे प्रत्येकजण अभिनेत्री परतल्याने खूप आनंदी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!