साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीने गुन्हा कबुल केला, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती
मुंबई,
साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषद घेत, आरोपीने गुन्हा कबुल केल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
आरोपीला सध्या 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा कसा झाला याचा घटनाक्रम पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. येत्या महिनाभरात किंवा त्याआधी संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, असंही पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगच्या सदस्या चांद्रमुखी आणि अरुण हलदर यांनी सुद्धा भेट दिली आणि चर्चा केली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अधिकार्यांशी देखील चर्चा केला आहे. तसेच आज 1.30 वाजता मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकार्यांची सह्याद्री येथे बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचं समोर आलं होतं. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.