भारताला विकसित राष्ट्र होण्यासाठी संशोधन आणि विकासाकरता सक्षम व्यवस्था आवश्यक- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली,

भारताला विकसित राष्ट्र होण्यासाठी संशोधन आणि विकासाकरता सक्षम व्यवस्था उभारण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी भर दिला आहे. याकरता फलदायी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी उद्योगांबरोबर संवाद वाढवावा, त्याद्वारे हवामान बदल, प्रदूषण, आरोग्य आणि गरिबी सारख्या समकालीन आव्हानांना सामोरे जाता येईल असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

उपराष्ट्रपतींनी आज पुद्दुचेरीमध्ये, पुद्दुचेरी तंत्रज्ञान विद्यापीठाचे उद्घाटन केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन हे विकसित देशांना इतर देशांच्या पुढे ठेवते असे त्यांनी अधोरेखित केले.

पुदुचेरी तंत्रज्ञान विद्यापीठ (पीटीयू), केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीचे पहिले राज्य विद्यापीठ आहे जे 1986 मध्ये स्थापन झालेल्या पॉन्डिचेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुधारणा करून स्थापन करण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक डिझाईन, उत्पादन निर्माण आणि ड्रोन तंत्रज्ञान सारख्या विविध क्षेत्रात 15 स्टार्ट-अप यशस्वीरीत्या सुरू करण्यासाठी संस्थेत स्थापन केलेल्या अटल इनक्यूबेशन केंद्राची प्रशंसा करत, उद्योजकता आणि नवोन्मेषी क्षेत्रात भारत नवीन उंची गाठत आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले.

कोविड -19 महामारीच्या काळात टेस्टिंग किट, स्वस्त व्हेंटिलेटर तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि मालवाहतुकी संदर्भात जीवनरक्षक नवकल्पना घेऊन येणार्‍या भारतीय स्टार्ट-अपचेही उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.

तांत्रिक शिक्षणाचा दर्जा उंचावल्याबद्दल पाँडिचेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे त्यांनी कौतुक केले. केंद्रशासित प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीच्या उत्थानामध्ये महाविद्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले.

पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सुंदरराजन, मुख्यमंत्री, श्री एन. रंगसामी, श्री पी एम एल कल्याण सुंदरम, प्राचार्य, पुडुचेरी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!