माहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती

नवी मुंबई, दि. 9 : सचिव तथा माहिती व जनसंपर्कचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी आज कोकण विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिली. तसेच कोकण विभागात होणाऱ्या मुसळधार पावसाचा आढावा घेतला. विभागीय कोकण आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून ही माहिती घेतली.

कोकण विभागात दोन दिवसाआधी पावसाचे आगमन झाले आहे.  ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दि. 10 व 11 जूनला रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे. आपात्कालीन परिस्थितीची अचूक माहिती बातम्यांच्या स्वरुपात व इतर समाज माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम विभागीय माहिती कार्यालय व त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत चोखपणे पार पाडले जाते.  संभाव्य अतिवृष्टीच्या काळात बातम्यांच्या प्रसिद्धी विषयक कामांचे नियोजन व कोकण विभागात होणाऱ्या पावसाचा आढावा घेण्यासाठी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी विभागीय माहिती कार्यालयास अचानक भेट दिली.

यावेळी डॉ.पांढरपट्टे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कोरोना काळात प्रसिद्धीच्या कामात खंड न पडू देता काम केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.  तसेच येणाऱ्या काळातही कर्मचाऱ्यांकडून अशाच कौतुकास्पद कामाची अपेक्षा व्यक्त केली. सोबतच कुटुंब प्रमुखाप्रमाणे पावसाळ्यात सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, अशा सूचनाही दिल्या.

यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी कोकण विभागाच्या कामकाजाचा अहवाल डॉ.पांढरपट्टे यांच्या समोर मांडला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!