ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला महावितरण, महापारेषण मुख्यालय इमारतींच्या सुरक्षेचा आढावा
मुंबई, दि.९: राज्यातील वाढत्या आगीच्या घटना पाहता व पावसाळ्यातील खबरदारी म्हणून महावितरण आणि महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या वांद्रे येथील प्रकाशगड व महापारेषणचे मुख्यालय प्रकाशगंगा या इमारतींच्या अग्निसुरक्षेबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रालयीन दालनात आढावा बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. राऊत यांनी या दोन्ही इमारतींचे अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा अंकेक्षण (फायर ऑडिट) झाले असल्यास व त्या ऑडिटमध्ये त्रुटी असल्यास त्याची पूर्तता झाली आहे का याबाबत विचारणा त्यांनी केली. या ऑडिटमधील त्रुटींची पूर्तता झाली नसल्यास तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणला दिले.
महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या ऊर्जा विभागाअंतर्गत असलेल्या तिन्ही कंपन्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची नेमणुका केल्या आहेत का याबाबत माहिती घेऊन अग्निसुरक्षेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काय व कधी प्रयत्न केले आहेत याची विचारणाही त्यांनी केली.
या इमारतींच्या मोकळ्या जागेत काही अनावश्यक सामान, साहित्य ठेवले तर नाही ना याची खात्री करा. तसेच अग्निसुरक्षेबाबत कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याची भित्तीपत्रके योग्य ठिकाणी लावलेली आहेत का तसेच नसल्यास तसे लावण्यात यावीत. अग्निशामक दल, पोलीस दल, रुग्णवाहिका इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक, मोबाईल फोन योग्य त्या ठिकाणी लावण्यात याव्यात अशा सूचना यावेळी डॉ. राऊत या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.