राज्यात मंदिरं कधी उघडणार? राजेश टोपे यांनी दिले स्पष्ट संकेत
जालना,
राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिरं आणि सिनेमागृह उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. मंदिरं उघडण्याचा निर्णय हा दसरा आणि दिवाळीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
’मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता दसरा आणि दिवाळीचं सण देखील तोंडावर आला आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.
तसंच, मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून अश्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक असल्याची संतप्त प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.
’महाविकास आघाडी सरकार राज्यात शक्ती कायदासंदर्भात काही सजेशन्स होते. त्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा पण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी अपेक्षा देखील टोपेंनी व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
’आपण आणि आपल्या कार्यालयांच्या वेळा विभागून घ्या. एकाच वेळी गर्दी करू नका. ज्यांना वर्कफॉर्म शक्य आहे, त्यांना वर्कफॉर्म करू द्यावा. आम्हाला सुद्धा कल्पना आहे की प्रत्येक वेळी सर्वांना बंधनात ठेवता येणार नाही. सणासुदीचे दिवस आहे. गर्दी करू नका. हॉटेल, रेस्टारंट, मॉल, मंदिर याबद्दल या निर्णय उद्या होणार्या टासफोर्सच्या बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती.