बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव-; मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई,

मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता याठिकाणी पावसानं उघडीप घेतली आहे. पण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव- होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात येत्या तीन चार दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांचा याचा सर्वाधिक धोका असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणात आणि किनारपट्टी परिसरात राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी मुंबईत दिवसभर संततधार होती. तर तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता  सोमवार आणि मंगळवारी पालघर आणि ठाणे परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेत. तर आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑॅरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

शनिवारी सांताक्रूझ येथे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान 11.4 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तर कुलाबा येथे 7.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी तसेच ठाणे, मुलुंड, कुर्ला, बेलापूर, जुईनगर, वाशी अशा तुरळक ठिकाणी दिवसभरात 30 मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही मागील चोवीस तासांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!