सावधान! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकार्‍यांचा इशारा

मुंबई,

महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ नोंदवली गेली, तसाच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लोक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे ही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

देशातील अनेक राज्यात सार्वजनिक उत्सवांनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं यापूर्वीही दिसून आलं आहे. नुकतंच केरळमध्ये ओणमनंतर रुग्णसंख्या वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातही सध्या गणेशोत्सव साजरा होत असून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचं चित्र आहे. बहुतांश नागरिका सध्या मास्क वापरत नसल्याचं चित्र दिसत असून त्यामुळे कोरोना वेगाने फैलावण्याची भीती राज्याचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलं आहे.

गणेशोत्सवाच्या काळात जर कोरोना संकेतांचं नीट पालन केलं, तर मात्र कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्यापासून रोखली जाऊ शकते, असं अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशनची काळजी घेणं, मास्कशिवाय प्रवेश न देणं ही खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं आरोग्य अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची केंद्रं वाढवणं आणि त्याचबरोबर टेस्ट आणि औषध पुरवठा यांची सोय करणं गरजेचं असल्याचा सल्लाही आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कोरोनाचा पॉजिटिव्हिटी दर हा 2.67 टक्के नोंदवला गेला आहे. शनिवारी राज्यात 3075 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 64,94,254 एवढी झाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!