गुन्हेगारांची हिंमत तर बघा! नाशकात आयुक्तांची फेक सही करुन केला मोठा कांड
नाशिक,
विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत एका बेरोजगार तरुणाला 21 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच संबंधित तरुणानं थेट आयुक्तांना भेटून आपली कैफियत मांडली आहे. ही घटना समोर येताच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
आरोपीनं व्हॉल्व्हमन पदाचं आमिष दाखवून फिर्यादी तरुणाकडून 21 लाख रुपये उकळले आहेत. शिवाय 2020 मध्ये नियुक्ती पत्र देखील देण्यात आलं होतं. पण संबंधित नियुक्ती प्रमाणपत्रावर बनावट डिजीटल स्वाक्षरी करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. राधाकृष्ण गिमे हे 2019 साली नाशिकचे महापालिका आयुक्त होते. आरोपीनं यांच्याच बनावट सहीचा वापर करत फिर्यादीला गंडा घातला आहे.
पण संबंधित नियुक्तीपत्र बनावट असल्याचं समोर आल्यानंतर हे पत्र आयटी विभागाकडे तपासणीसाठी देण्यात आलं आहे. माजी आयुक्तांची डिजीटल स्वाक्षरीचा वापर कोणी केला, यात महापालिकेतील संबंधित कोणी आहे का? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेत नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक केल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडून बेरोजगार युवक कुणावरही विश्वास ठेवायला तयार होतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची कसलीही शाहनिशा न करता मागेल तितके पैसे देतात. अशा घटनेत आरोपी लाखो रुपये घेऊन बनावट कागदपत्रं देत परगंदा होतात. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येईपर्यंत आरोपी अन्य ठिकाणी फरार होतो. त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.