राशिद खानचा अफगाणिस्तान क्रिक्रेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा; संघ निवडीमध्ये स्थान न दिल्याने निर्णय

काबुल

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथल्या क्रिकेटचे काय होणार असा सवाल विचारला जात होता. त्यानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा भूकंप झाला असून राशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने गुरुवारी टी 20 विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच राशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने निवडलेल्या संघावर राशिद खान नाराज असून संघाची निवड करताना आपला सल्ला घेतला नसल्याचं त्याने म्हटलं आहे. राशिद खानने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की, ‘कर्णधार आणि देशाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला संघाच्या निवडीच्या हिस्सा बनण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीने मला कोणताही सल्ला विचारला नाही. त्यामुळे मी तात्काळ प्रभावाने टी 20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.‘

संघ निवडीत कोणत्या खेळाडूवरुन राशिद खान नाराज आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. राशिद खान टी 20 मधील जगातील तिसर्‍या क्रमांकाचा गोलंदाज आहे. राशिद खानच्या राजीनाम्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने आता संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद नबी याची नियुक्ती केली आहे.

आयसीसी टी 20 विश्वचषक सामने 17 ऑॅक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि ओमनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!