औरंगाबादमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, पाण्यात वाहून गेल्याने एका मुलीचा मृत्यू, दुसरी बचावली

औरंगाबाद

शहरात मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे शहर जलमय झाले होते. त्या दिवशी अवघ्या एका तासात 116 मि.मी. पावसाची नोंद झाली असून या पावसाच्या पाण्यामुळे मुकुंदवाडी भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होत. त्याच दरम्यान या रस्त्यावरुन जाणार्‍या दोन तरुणी या पाण्यात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये एका मुलीचा बुडून दुर्दैर्वी अंत झाला. तर दुसरी सुदैवाने बचावली. या घटनेमुळे मुकुंदवाडी भागात संतापाची लाट पसरली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर महालिका आणि पोलीस प्रशासनाकडून बुधवारी दुपारपर्यंत साधा पंचनामा देखील करण्यात आला नव्हता. त्यामुळे मुलीच्या पालकांसह शहारातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच पालिका प्रशासनाच्या विरोधात जमावाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुकुंदवाडीतील रेल्वे गेट क्र. 56 जवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रुपाली दादाराव गायकवाड (21) आणि आम-पाली रघुनाथ म्हस्के (18, दोघीही रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी पाण्यात वाहून गेलेल्या मुलींची नावे आहेत. या दोन्ही मुली शेंद्रा एमआयडीसीतील धुत ट्रान्समिशन कंपनीत कामाला आहेत. यामध्ये रुपालीचा मृत्यू झाला.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास काम संपल्यावर दोघीही घराकडे निघाल्या होत्या. त्याचदरम्यान शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झाले. रस्त्याला नदी, नाल्याचे स्वरुप आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास रुपाली आणि आम-पाली मुकुंदनगरहून रेल्वे पटरी ओलांडून राजनगरकडे जात होत्या. रेल्वे गेट क्र. 56 जवळून जात असताना रुपाली पुढे तर आम-पाली तिच्या मागे होती. नेहमीचा रस्ता असल्यामुळे रुपालीने रस्ता समजून पाण्यात पाय ठेवला. मात्र, अतिवृष्टीमुळे रस्ता आधीच वाहून गेला होता. त्यामुळे तेथे भला मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात रुपालीचा पाय पडला. तेवढ्यात तिच्या मागे असलेली आम-पाली देखील त्याच खड्ड्यात पडली.

पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने दोघीही वाहून जावू लागल्या तेवढ्यात आम-पालीने काही अंतरावर एका झाडाला पकडले होते. तर रुपाली तशीच पाण्याच्या प्रवाहातून वाहून जात होती. हे पाहून आम-पालीने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने रुपालीचा शोध घेतला. काही अंतरावरुन त्यांनी रुपालीला बाहेर काढले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

पंचनामा न केल्याने संताप-

या घटनेनंतर रुपालीच्या मृत्यूची बातमी शहरभर पसरली. मात्र तिच्या मृत्यूनंतर प्रशासानाने पुढील कार्यवाही करणे गरजेचे असताना देखील बुधवारी दुपारपर्यंत रुपाली्च्या मृत्यू प्रकरणाचा साधा पंचनामा करण्यासाठी पोलीस अथवा मनपाचे अधिकारी आले नाहीत. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुपालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव सचिन बनसोडे, जिल्हा सचिव अमोल पवार, राहुल निकम, पूर्व संघटनमंत्री सिराज शेख, विष्णू वाघमारे, प्रल्हाद तारु यांच्यासह नागरिकांनी मुकुंदनगर भागात आंदोलनाला सुरुवात केली.

आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतला-

आंदोलनाला सुरुवात झाल्याची माहिती मिळाल्यावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज पगारे, दुय्यम निरीक्षक ब-ह्मा गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मनपाने कुठल्याही सुविधा न दिल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप जमावाने केला. अखेर मनपाचे वार्ड अधिकारी श्रीधर तारपे यांनी या भागातील रस्ते बनविणे आणि रुपालीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!