अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर,

घरात झोपलेल्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोन नराधमांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिला आहे. बुलडाणा सत्र न्यायालायानं नराधम आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेत कमी करत नागपूर खंडपीठानं दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईन अशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमांची नावं आहेत. संबंधित दोघांनी 26 एप्रिल 2019 रोजी रात्री 10 च्या सुमारास एका 9 वर्षीय मुलीचं अपहरण केलं होतं. यावेळी पीडित मुलगी आपल्या घरात कुटुंबासोबत झोपली होती. पण नराधमांनी अत्यंत चलाखीनं पीडित मुलीचं तिच्या घरातून अपहरण केलं होतं. यानंतर नराधमांनी अमानुषतेचा कळस गाठत आळीपाळीनं पीडितेवर बलात्कार केला होता.

या घटनेचा माहिती समोर येताच बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपींनी बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळले होते. बुलडाणा सत्र न्यायालयात या घटनेची सुनावणी झाली असता, न्यायालयानं दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं संबंधित दोषींची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. नागपूर खंडपीठानं आरोपींनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!