तुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर – दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान

औरंगाबाद,

औरंगाबादच्या पाचोड भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका इथल्या मोसंबीच्या बागांना बसला आहे. मोसंबीच्या बागा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे झाडांचे मोठं नुकसान झाले आहे. पाण्याचा वेळीच निचरा न झाल्यास मुळकूज, बुरशीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये काल रात्री तुफान पाऊस झाला. शेतातील पीकं पूर्ण आडवी झाली आहेत. पाणी शेतात शिरल्यामुळे शेताला नदीचं स्वरुप आले आहे. शेतकर्‍याच्या डोळ्यात अश्रू आहेत. सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. औरंगाबादमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी टिळक पथ बाजारपेठेतील अनेक दुकानांत अजुनही पाणी आहे.. पंप लाऊन पाणी उपसण्याचं काम सुरु आहे.

पावसाने दाणादाण उडवली

औरंगाबाद बाजारपेठेत पावसाने दाणादाण उडवलीय. औषधी भवन परिसरात 8 ते 10 गाड्या वाहून गेल्या. त्यातल्या काही गाड्या काढण्यात नागरिकांना यश आले आहे. मात्र अजूनही काही गाड्या पाण्याखालीच आहेत. इथल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झाले आहे. तर हर्सूल तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.

या पुरातन निजामकालीन तलावातून औरंगाबादच्या जुन्या शहराला पाणीपुरवठा होतो. जवळपास महापालिकेच्या 20 ते 25 वॉर्डला या तलावातून पाणीपुरवठा होतो. आता जुन्या शहराला किमान वर्षभर तरी यातून पाणीपुरवठा होऊ शकेल. हा तलाव भरल्यामुळे जायकवाडीवरील पाण्याचा ताण कमी झालाय.

निम्म्या मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली

जोरदार पावसाने मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अनेक छोटी-मोठी धरणं भरली आहेत. सततच्या पावसानं धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. तर जायकवाडीतही पाण्याची आवक सुरुच आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठा शिवना टाकळी प्रकल्प 95 टक्के भरला आहे. या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील तसेच या नदीकाठी वसलेल्या सर्व गावांना प्रशासनाने इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादसह मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे अजिंठा लेणीजवळील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचं मोहक दृश्य सध्या पर्यटकांना मोहिनी घालत आहे. बर्‍याच दिवसानंतर इतका मुसळधार पाऊस झाला आणि हा धबधबा प्रवाहित झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!