निंभोरा रेल्वे स्थानकात दादर अमृतसर एक्सप्रेस गाडीचा थांबा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

अनिल बोरनारे यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट

निंभोरा बु प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे.9922358586 )

कोरोनाचे कारण देत निंभोरा रेल्वे स्थानकात बंद केलेली दादर-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी निंभोरा येथील रहिवासी व भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
याबाबत अनिल बोरनारे यांनी सीएसटी स्थानकातील हेरिटेज सभागृहात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासमवेत कल्याणचे माजी आमदार व भाजपा प्रदेश भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार उपस्थित होते.

निंभोरा हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे गाव असून केळी व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. येथील रेल्वे स्थानकावर दादर अमृतसर एक्सप्रेस ही गाडी क्रमांक अप ०१०५७ व डाउन ०१०५८ अशी दोन्हीकडील प्रवासासाठी म्हणजेच मुंबई, दिल्लीकडे जाण्यासाठी एकमेव अशी पठाणकोट एक्सप्रेस गाडी आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून कोरोना मुळे या गाडीचा थांबा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांची खूप गैरसोय होत आहे.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे निंभोरा पंचक्रोशीतील जनसामान्य प्रवासी जनतेत प्रचंड नाराजी आहे. वास्तविक पाहता निंभोरा स्थानकात प्रवाश्यांच्या मागणीवरून कामयानी एक्सप्रेस व पवन किंवा काशी एक्सप्रेस या गाड्यांचेही थांबे निंभोरा येथे देण्यात यावेत अशीही मागणी केली असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. यावर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले. यावेळी मध्यरेल्वेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!