गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना टोल माफ, मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई,
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच सर्व चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणार्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसर्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या सावात पार पडणार आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणार्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावाकडे जाणार्यांना टोलमाफीचे स्टिकर पुरवले जाणार आहेत. त्यासाठी चाकरमान्यांना आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. गणेश आगमनाच्या दोन दिवसआधीपासून या टोलमाफीला सुरुवात होईल आणि गणेश विसर्जनानंतर दोन दिवसापर्यंत ही टोलमाफी असेल.‘
टोलमध्ये सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलीस स्टेशन, आरटीओ कार्यालयात आपला वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव व प्रवास तारीख नमूद केल्यास तात्काळ टोल माफी स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामध्ये तिसर्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सरकार, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचं आगमन या सार्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली गेली आहे. या नियमावलीनुसार दोन डोस पूर्ण न झालेल्या व्यक्तिला आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रवेश करताना किमान 72 तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे. तसेच रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी सदर व्यक्तिची चाचणी केली जाईल. यावेळी चाचणी पॉझिटीव्ह आल्यास सदर व्यक्तिला संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. पण, दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तिला मात्र यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेल्या असल्यास जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे.