येत्या 5 दिवसात राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईसह पुण्यालाही झोडपणार पाऊस
मुंबई,
ऑॅगस्ट महिन्यांत महाराष्ट्रात मान्सूननं निराशा केल्यानंतर, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सूननं राज्यात दिमाखात आगमन केलं आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मागील चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यानंतर आता येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तीव- होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मागील 2-3 दिवसापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर काल मराठवाड्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे काहीअंशी शेतकर्यांची चिंता कमी झाल्याची पाहायला मिळत आहे.
पुढील पाच दिवसात कोकणात सर्वत्र पावसाची स्थिती आहे. प्रामुख्यानं उत्तर कोकणात धुव्वाधार पावसाची बॅटींग होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कोकणात अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. उद्या मुंबई आणि पुण्यासह अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्या कोकणात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस पडू शकतो.
काल मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आज सकाळी देखील मुंबईतील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर पुणे जिल्ह्याला देखील मागील चोवीस तासांत मुसळधार पावसानं झोडपलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांसाठी पुण्याला हवामान खात्यानं ऑॅरेंज अलर्ट दिला आहे.