खूशखबर! कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे 5 हजार तिकिटे शिल्लक
मुंबई ,
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदाच मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल ट्रेनची किती तिकिटे उपलब्ध आहेत याची माहिती रेल्वेच्या अधिकृत टिवटर अकाऊंटमधून देण्यात येत आहे. त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान धावणार्या गणपती स्पेशल ट्रेनची तब्बल पाच हजार 214 तिकिटे शिल्लक आहेत.
रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल
एकीकडे कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती असताना, दुसरीकडे अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. कोकणात जाणार्या रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे गणपती स्पेशल ट्रेनची संख्याही वाढवण्यात येत आहे. मात्र, 8 आणि 9 सप्टेंबरच्या सर्व रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ज्या गाड्यांचे तिकीट शिल्लक आहे. अशा गाड्यांची माहिती रेल्वेच्या अधिकृत टिवटर अकाऊंटमधून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होत आहे.
या गाड्यांचे तिकिटे शिल्लक
सध्या मध्य रेल्वे मार्गावरून धावणार्या 01233 पनवेल-रत्नागिरी, 01243 पनवेल-कुडाळ, 01257 एलटीटी-सावंतवाडी, 01259 पनवेल-सावंतवाडी,01261 पनवेल-चिपळुण, 01263 दादर-रत्नागिरी या गाड्यांची 5,6,7 आणि 10 सप्टेंबरची पाच हजार 214 तिकिटे उपलब्ध आहेत. यामध्ये सेकण्ड एसी, थर्ड एसीची तिकिटे सर्वाधिक आहेत. रेल्वेतर्फे 23 सप्टेंबरपर्यत गणपती स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. याची माहीती मध्य रेल्वेने आपल्या टिवटर अकाऊंटवरून दिली आहे.
असे आहे नियम
ज्या चाकरमान्यांचे कोरोना लसीचे दोन डोस पुर्ण झाले असतील, त्यांना कोकणात प्रवेश खुला असेल.
18 वर्षांखालील तरूण, बालकांना कोरोनाची लस नसल्याने त्यांना देखील कोकणात प्रवेश असेल.
72 तासांअगोदर आरटीपीसीआर चाचणी केलेले प्रमाणपत्र असल्यास या चाकरमान्यांना देखील कोकणात प्रवेश दिला जाईल.
ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी केली नसल्यास, जिल्ह्यांच्या सीमेवर त्वरीत कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास तत्काळ जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल.