रेल्वे कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी : गणेशोत्सवासाठी मिळणार अ‍ॅडव्हान्स पगार!

मुंबई,

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता यावा, यासाठी सप्टेंबर महिन्याचा पगार अनंत चतुर्दशीच्या आधीच मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मध्य रेल्वेची सूचना –

कोरोनामुळे घर खर्च, आरोग्य खर्च, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. त्यात सण साजरे करणे कठीण झाले आहे. एका आठवड्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची तयारी योग्यरित्या करता यावी, गणरायाचा उत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांना सप्टेंबर महिन्याचा पगार 18 सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. यासाठी पगाराची प्रक्रिया 14 सप्टेंबर रोजीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासगी कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त वेळेआधीच पगार दिला जातो. त्यामुळे गणेशोत्सवात त्यांना आर्थिक अडचण जाणवत नाही. यंदा रेल्वे कर्मचार्‍यांनी सुद्धा गणेशोत्सवानिमीत्त वेतन लवकर करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल रेल्वेने घेतली आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांनी मानले आभार –

10 सप्टेंबरला गणेशोत्सव असून बाप्पाच्या आगमनाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची तयारी योग्यरित्या व्हावी, गणरायाच्या उत्सवात आर्थिक विघ्न येऊ नयेत, म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला वेळेत वेतन करण्याची मागणी केली होती. मध्य रेल्वेने आमची ही मागणी मान्य केली आहे. त्यासाठी आम्ही रेल्वेचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया रेल्वे कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!