वीजमीटरच्या रिडिंगमध्ये हयगय झाल्यास थेट काळ्या यादीत मीटर रिडींग एजन्सीजला महावितरणचा कठोर इशारा
पुणे,
वीजमीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रिडींग घेतल्याने महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे वीजमीटरचे अचूक रिडिंग घेण्यामध्ये हयगय आढळून आल्यास संबंधीत मीटर रिडींग एजन्सीला आर्थिक दंडासह थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल व महावितरणमध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांना काम मिळणार नाही याची दक्षता घेतली जाईल असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिला.
वीजमीटरमधील सदोष रिडींग व चुका टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत गणेशखिंड, रास्तापेठ व पुणे ग्रामीण मंडल तसेच सातारा, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली मंडलनिहाय मीटर रिडींग एजन्सीच्या कंत्राटादारांची आढावा बैठक घेण्यात येत आहे. पुणे येथील ’प्रकाशभवन’मध्ये आयोजित गणेशखिंड मंडलमधील मीटर रिडींग एजन्सीच्या कंत्राटदारांच्या बैठकीत श्री. नाळे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता (संचालन) श्री. शंकर तायडे व श्री. पंकज तगलपल्लेवार (गणेशखिंड मंडल), उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत मीटर रिडींगमध्ये होणार्या चुका व सदोष रिडींगबाबत उदाहरणांचे सादरीकरण करून विविध उपाययोजनांबाबत श्री. नाळे यांनी निर्देश दिले.
पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे म्हणाले, की महावितरणने वीजमीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे सुरु केल्यानंतर मीटर रिडींगमध्ये अचूकता आली आहे. वीजग्राहकांना मीटर रिडींगचे अचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना देखील एजन्सीजच्या कामचुकार व निष्काळजीपणामुळे मीटरच्या रिडींगमध्ये सदोषता किंवा चुका आढळून येत आहेत. त्या अजिबात सहन केल्या जाणार नाही. महावितरणकडून देखील एजन्सीजने घेतलेल्या मीटर रिडींगची पडताळणी करण्यासाठी सरासरी 5 टक्के मीटर रिडींगची तपासणी व पर्यवेक्षण करण्यात येत आहे. यापुढे हेतुपुरस्सरपणे सदोष किंवा चुका असलेल्या मीटर रिडींगचे प्रकार आढळून आल्यास संबंधीत मीटर रिडींग एजन्सीला आर्थिक दंड लावण्यासह काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे प्रादेशिक विभागासह महावितरणच्या कार्यक्षेत्रात कुठेही मीटरच्या रिडींगचे कंत्राट मिळणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी स्पष्ट केले.
वीजमीटरच्या रिडींगसाठी एजन्सीच्या कामाचे महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी पर्यवेक्षण करावे व कामात हयगयपणा दिसल्यास संबंधीत एजन्सीविरुद्ध ताबडतोब कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश यावेळी श्री. नाळे यांनी दिले. बैठकीला सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. राहुल पवार तसेच कार्यकारी अभियंता, इतर अधिकारी आदी उपस्थित होते.