उद्धव ठाकरे व शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी हे चंद्रकांत पाटलांचे विधान वास्तववादी : सदाभाऊ खोत
नांदेड,
महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता दोन चेहरे झालेत, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर केलेलं भाष्य हे वास्तववादी असल्याचे मत राज्याच्या पंचायतराज समिती दौर्यावर असणारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहलंय की शेतकर्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग-ेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची जी कुटणीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही.
शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहित झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी मी सहमत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
भाजप एकट्याच्या बळावर सरकार स्थापन करणार तशी तयारी आपली सुरू आहे. यावेळी युतीत निवडणूक लढणार नाही. फक्त जे प्रामाणिकपणे आपल्या सोबत आहे ज्यांच्या सोबत निवडणूक लढवणार. पण नाव मोठं लक्षण खोटं आपल्याला नको. पाठीत खंजीर खोपसणारे आपल्याला नको असं बोलत चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होता. पाठीत खंजीर खुपसणारं एकच नाव आधी होतं, पण आता दुसरा चेहरा दिसतोय, असं म्हणत थेट शिवसेनेवर चंद्रकांत पाटलांनी टीका केली होती.