जातपंचायतीकडून घटस्फोट घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकले वाळीत, पुरोगामी पुण्यातील प्रकार
पुणे,
एका दाम्पत्याने जातपंचायतीकडून घटस्फोट न घेता न्यायालयात घटस्फोटाचा दावा टाकल्याने एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मार्च 2018 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत ही घटना घडली. 14 जणांच्या विरोधात याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव करेप्पा वाघमारे, करेप्पा मारुती वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे, महादेव भोरे, रामदास भोरे, विष्णू वाघमारे, मारुती वाघमारे गोविंद वाघमारे यांच्यासह 14 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम कृष्णा सागरे (वय 33) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गोंधळी समाजाचे आहेत. या समाजात जात पंचायत चालवली जाते. आरोपी करेप्पा, बाजीराव, साहेबराव आणि बाळकृष्ण हे जातपंचायतीचे पाटील आहेत. तर अन्य आरोपी पंच म्हणून काम पाहतात. फिर्यादीची पत्नी ही जात पंचायतीच्या पाटलांची नातेवाईक आहे. फिर्यादी आणि त्याच्या पत्नीचा काही कारणास्तव कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू आहे.
दरम्यान फिर्यादीने घटस्फोटासाठी जात पंचायतीची मदत घेतली नाही याचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्याच्या कुटूंबियांना आरोपींनी समाजातून बहिष्कृत केले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर वाकडे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.