शिवसेना आक्रमक, तरुणीच्या मृत्यूनंतर पालिका कार्यालयाची केली तोडफोड
नागपूर,
शिवसैनिकांनी येथील हनुमान नगर झोन कार्यालयाची तोडफोड केली. नरसाळा परिसरात नाल्याच्या पाण्याने रस्ता जलमय झाला होता. यावेळी अत्यवस्थ असलेल्या एका तरुणीला उपचाराला उशीर झाल्याने जीव गमवावा लागला, असा आरोप शिवसेना आणि तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. तरुणाची मृत्यू झाल्याने शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी काल हनुमाननगर झोन कार्यालयात तोडफोड केली.
दरम्यान, नाल्याच्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि बेफिकीर कारभारामुळे तरुणीचा जीव गेल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. तरुणीच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे कारणावरून शिवसेनेच्यावतीने हनुमान नगर झोनमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करीत झोन कार्यालयात चांगलाच राडा घातला आणि तोडफोड केली.
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 29, नरसाळा येथील राष्ट्रसंत नगरमध्ये राहणार्या जान्हवी विंचूरकर या 17 वर्षीय तरुणीची प्रकृती 31 ऑॅगस्टच्या रात्री बिघडली. तिच्यावर तातडीने उपचाराची गरज होती. मात्र घराभोवती साचलेल्या पाण्यामुळे न अॅम्ब्युलन्स येऊ शकत होती, ना आजारी व्यक्तीला घरातून बाहेर काढता येत होते. सकाळी कसेतरी तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर उशीर होऊन जानव्हीचा दुर्दैर्वी मृत्यू झाला.
या घटनेबाबत कळताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. नागरिक आणि शिवसैनिकांनी महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये पोहचून दोषींवर कारवाईची आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत झोनमधील साहित्याची तोडफोडही केली.