देशातल्या पंचाहत्तर हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार

आयुष मंत्रालयाने प्रारंभ केलेल्या या अभियानाची धुरा राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ सांभाळणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7,500 औषधी वनस्पतींचे तर उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना 750 औषधी वनस्पतींचे वाटप

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने, स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचा भाग म्हणून देशात औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अभियान हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच हरित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी याची मदत होणार आहे. या अभियाना अंतर्गत येत्या एक वर्षात देशभरात 75,000 हेक्टर जमिनीवर वनौषधींची लागवड केली जाणार आहे. उत्तरप्रदेशातल्या सहारणपूर आणि महाराष्ट्रातल्या पुणे इथे या कार्यक्रमाची सुरवात झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या मालिकेतला हा दुसरा कार्यक्रम आहे.

पुण्यामधल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. आधीपासूनच वनौषधीची लागवड करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथले आमदार निलेश लंके, युनानी औषध केंद्रीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ असीम अली खान, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ चंद्र शेखर संवल यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

देशात औषधी वनस्पतींच्या पुरवठ्याला यामुळे आणखी गती प्राप्त होणार असल्याचे डॉ चंद्रशेखर संवल यांनी सांगितले. यावेळी 75 शेतकऱ्यांना 7,500 वनौषधीचे वाटप करण्यात आले. 

औषधी वनस्पती आणि त्यांची लागवड या क्षेत्रात देशाची  अपार क्षमता असून 75,000 हेक्टरवर अशा वनस्पतींची लागवड केल्याने देशात या औषधांची उपलब्धता सुनिश्चित होऊन शेतकऱ्यांना उत्पनाचा मोठा स्त्रोत ठरणार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. यामुळे औषध  क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होईल. गेल्या दीड वर्षात औषधी वनस्पतींची बाजारपेठ केवळ  भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. यामुळेच अश्वगंधा हे  अमेरिकेतले सर्वात जास्त विक्रीचे तिसरे उत्पादन ठरले आहे, असे ते म्हणाले . 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!