शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांचा प्रतिसाद कौतुकास्पद – राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर
गडचिरोली जिल्हा मुख्यालयी शिवस्वराज्य दिन कार्यक्रम संपन्न
गडचिरोली – दि.06 : गडचिरोली जिल्ह्यात आज, दि.6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी ‘शिवस्वराज्य दिन’ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, गडचिरोली येथे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यासह राज्यात सर्वच ठिकाणी शिवस्वराज्य दिना निमित्त नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. कोविड संसर्गाबाबत आवश्यक काळजी घेऊन कमीत कमी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जिल्हा परिषद येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हावासीयांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भगवा स्वराज्यध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा या दिवशी देण्यात आला. तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली.