सणासुदींच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या निर्देशांचं पालन होणार, राज्यात रात्रीच्या संचारबंदीची शक्यता
मुंबई,
केरळमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालंय. राज्यातही रात्रीच्या संचारबंदीची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवली आहे. राज्यात सण उत्सवांना सुरुवात झाली आहे. मात्र केरळमध्ये वाढलेली कोरोना बाधितांची संख्या पाहता केंद्राने राज्याला सूचना केल्या आहेत. त्यामुळे येणार्या सणा-सुदीबाबत राज्यात केंद्राने दिलेले निर्देश पाळले जातील असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढच्या महिन्यापासून राज्याला 50 लाख लस अधिकच्या मिळणार असल्याची माहिती देखिल टोपे यांनी दिलीय.
गणेशोत्सावासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांनाही नियमांचं पालन करावं लागणार आहे. कोकणात जाणार्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरणाची अट पूर्ण करावी लागणार आहे. शासनाच्या आदेशाचे जनहितासाठी तंतोतंत पालन करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.