पिंपरी-चिंचवडमधील मीरचंदानी पाम्स सोसायटीत आढळले 40 कोरोनाबाधित
पिंपरी-चिंचवड (पुणे) ,
शहरातील कोकणे चौक येथे मीरचंदानी पाम्स या गृहनिर्माण सोसायटीत 40 हून अधिक रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 21 ते 27 ऑगस्टदरम्यान 32 रुग्ण आढळले असून, त्यात वयोवृद्ध व लहान मुलांचा समावेश आहे. या सोसायटीतील सर्व रहिवाशांची चाचणी केली जाणार असून, त्यासाठी शिबिर भरविले आहे. मात्र, दोन दिवसांत शिबिरात किती नागरिक पॉझिटिव्ह आले, याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत ही सोसायटी सील करण्यात आली आहे.
आकडेवारी देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ –
कोकणे चौक येथील रामबाग कॉलनीत मीरचंदानी पाम्स ही मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. याठिकाणी 200 हून अधिक सदनिका आहेत. 21 ऑगस्ट रोजी या सोसायटीमधील 3, 22 ऑगस्टला 2, 23 ला 4, 24 रोजी 2, 25 ला 2, 26 रोजी 6 आणि 27 ऑगस्टला 13 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 28 आणि 29 ऑगस्ट रोजी या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडून सर्व रहिवाशांची कोरोना अँटीजेन चाचणी केली जात आहे.