अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली,

सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने निवृत्ती जाहीर केली आहे. बराच काळ 37 वर्षीय बिन्नी भारतीय संघाबाहेर होता. तो 2016 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. देशांतर्गत क्रिकेटद्वारे तो संघात परतण्याचा प्रयत्न करत होता. 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार्‍या स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी सहा कसोटी, 14 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नींचा तो मुलगा आहे.

त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आहे. त्याने 2014मध्ये बांगलादेशविरुद्ध चार धावा देऊन सहा विकेटस घेतल्या. कोणताही भारतीय गोलंदाज आजपर्यंत त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये बिन्नीच्या 194 धावा आणि 3 विकेट, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 230 धावा आणि 20 विकेटस, टी-20 क्रिकेटमध्ये 35 धावा आणि एक विकेट आहे. बिन्नीने 95 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4796 धावा केल्या आणि 148 विकेटस घेतल्या. 100 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 1788 धावा काढण्याबरोबरच 99 विकेटसही घेतल्या.

बिन्नी यावर्षी मार्च महिन्यात शेवटचा मैदानावर उतरला होता. त्याचा 100वा प्रथम श्रेणी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. बिन्नीने आपल्या शेवटच्या सामन्यात नागालँडसाठी अरुणाचल प्रदेशविरुद्ध नाबाद 55 धावांची खेळी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!