पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
नवी दिल्ली -29 AUG 2021
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी खेळाविषयी बोलणं होतं, त्यावेळी तर स्वाभाविकतेनं आपल्या डोळ्यासमोर तरूण पिढी येते. आणि ज्यावेळी तरूण पिढीकडे अगदी लक्षपूर्वक न्याहाळून पाहिलं तर किती मोठं परिवर्तन झाल्याचं दिसून येत. युवावर्गामध्ये मनपरिवर्तन झालंय. आणि आजचा युवावर्ग जुन्या- पुराण्या पद्धतींपेक्षाही काही तरी नवीन करू इच्छितोय. आजच्या युवकांना काहीतरी वेगळं, नवं, करण्याची इच्छा आहे. ही नवीन पिढी नवीन मार्ग तयार करू इच्छित आहेत. अगदी अनोळख्या क्षेत्रामध्ये आजच्या नवतरूणांना पावले टाकायची आहेत. त्यांच्यादृष्टीनं लक्ष्य नवं, शिखरही नवं आहे आणि त्यासाठी स्वीकारला जाणारा मार्गही नवा आहे. त्यांच्या मनामध्ये नवनवीन आशा-आकांक्षा आहेत. आणि एकदा का मनानं निश्चय केला केला ना, की युवक अगदी आपलं सर्वस्व पणाला लावून निश्चयपूर्तीसाठी रात्रं-दिवस परिश्रम करतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, भारताने आपल्या अंतराळ क्षेत्राला मुक्त केलं आणि पाहता पाहता युवा पिढीनं ही संधी साधली. त्याचा लाभ उठवण्यासाठी महाविद्यालयांतले विद्यार्थी, विद्यापीठ, खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं नवतरूण अगदी हिरीरीनं पुढं आले आहेत. आगामी दिवसांमध्ये आमच्या युवकांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या महाविद्यालयांनी, आमच्या विद्यापीठांनी, प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी काम करून, असंख्य, म्हणजे- खूप मोठ्या संख्येनं उपग्रह बनवले आहेत, हे सर्वांना दिसून येईल, असा मला विश्वास आहे.
याचप्रमाणे, कुठंही पहा, कोणत्याही कुटुंबामध्ये गेलात, आणि कितीही संपन्न परिवार असो, शिक्षित कुटुंब असो, जर तुम्ही त्या कुटुंबातल्या युवा पिढीबरोबर बोललात तर आजच्या काळातला युवक म्हणतो की, त्याला परंपरागत जे काही चालून आलं आहे, त्यापेक्षा खूप काही वेगळं करायचं आहे. आजचा नवयुवक म्हणत असतो, मला स्टार्ट-अप करायचं आहे. स्टार्ट-अपमध्ये मी जाणार आहे. याचाच अर्थ असा की कोणताही धोका पत्करायला त्याचं मन तयार आहे. आज लहान-लहान शहरांमध्येही स्टार्ट-अप संस्कृतीचा विस्तार होतोय. आणि त्यामध्ये उज्ज्वल भविष्याचे संकेत मला स्पष्ट दिसत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या देशामध्ये खेळण्यांविषयी चर्चा होत होती. पाहता पाहता आपल्या देशातल्या युवकांचं लक्ष या विषयाकडं गेलं. त्यांनीही मनानं निश्चय केला की, दुनियेमध्ये भारताच्या खेळण्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून द्यायची. आणि नवनवीन प्रयोग सुरू केले आणि जगामध्ये खेळण्यांचं खूप प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. 6-7 लाख कोटींची ही बाजारपेठ आहे. त्यामध्ये भारताचा हिस्सा फारच कमी आहे. परंतु खेळणी कशी बनवली पाहिजेत, खेळण्यांमध्ये वैविध्य कसं असलं पाहिजे, खेळण्यांमध्ये तंत्रज्ञान नेमकं कसं, किती असावं, मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्या अनुरूप खेळणं कसं असावं. या सर्व गोष्टींचा विचार आज आपल्या देशातले युवक करताहेत. आणि त्यावर लक्ष केंद्रीत करून काहीतरी भरीव कार्य करू इच्छित आहेत.
मित्रांनो, आणखी एक गोष्ट, मनाला खूप आनंद देणारी आहे. इतकंच नाही तर विश्वास अधिक दृढ करणारी आहे. ही गोष्ट कोणती, तुम्हा काही कधी जाणवलं का? सर्वसाधारणपणे आपला एक स्वभाव बनला होता, तो म्हणजे…. चालायचंच, असंच असतं…. परंतु मी आता या स्वभावामध्ये बदल घडून येत असल्याचं पाहतोय. माझ्या देशाचा युवक, आता सर्वश्रेष्ठतेच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी स्वतःचं मन केंद्रीत करत आहे. आपल्या देशाचे युवक आता सर्वोत्तम कार्य करू इच्छितात, तसंच कोणतंही काम सर्वोत्तम पद्धतीनं करू इच्छितात.हा ध्यास त्यांना लागला आहे, ही गोष्टही राष्ट्राच्या दृष्टीनं एक खूप मोठी शक्ती बनणार आहे.
मित्रांनो, यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांनी खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संपल्या आता दिव्यांगांच्या ऑलिपिंक स्पर्धा सुरू आहेत. क्रीडा जगतामध्ये आपल्या भारतानं जो काही पराक्रम केला तो विश्वाच्या तुलनेत भलेही कमी असो, परंतु या स्पर्धांनी आपल्या खेळाडूंमध्ये, युवापिढीमध्ये विश्वास निर्माण करण्याचं खूप मोठं काम केलं आहे. आज युवक फक्त खेळ, सामने फक्त पाहतोच असं नाही. तर त्याच्याशी संबंधित व्यवसायांमध्ये असलेल्या शक्यतांकडेही ते डोळसतेनं पहात आहेत. क्रीडा क्षेत्राशी संबंधित संपूर्ण इको सिस्टम अगदी बारकाईनं पहात आहे. या संपूर्ण व्यवस्थेचं सामर्थ्य किती आहे, हे युवक जाणून घेत आहेत. आणि कोणत्या ना कोणत्या रूपानं स्वतःला या व्यवस्थेशी जोडू इच्छित आहेत. आता ते पारंपरिक गोष्टींतून बाहेर पडून पुढे जावून नवीन व्यवस्था स्वीकारत आहेत. आणि माझ्या देशवासियांनो, आता इतकं परिवर्तन घडून आलं, इतकी चालना मिळाली आहे की, प्रत्येक परिवारामध्ये खेळ या विषयावर चर्चा सुरू झाली. आहे. आता मग, तुम्हीच मला सांगा, हे घडून आलेलं परिवर्तन, मिळत असलेली चालना थांबवली पाहिजे काय? अजिबात नाही! तुम्ही सर्वजणही माझ्याचप्रमाणं विचार करीत असणार. आता देशामध्ये खेळ, क्रीडा प्रकार, खिलाडूपणाचं चैतन्य, थांबून चालणार नाही. या परिवर्तनाला, चालनेला कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्राच्या जीवनामध्ये स्थायी बनवलं पाहिजे. यामध्ये अधिकाधिक ऊर्जा निर्माण केली पाहिजे, उत्साह आणला पाहिजे, क्रीडा विषयी सर्वांना निरंतर नव्यानं उत्साह वाटला पाहिजे. मग घरामध्ये असो, बाहेर असो, गाव असो, शहर असो, आपल्याकडची सर्व मैदानं खेळाडूंनी भरून गेली पाहिजेत. सर्वांनी खेळलं पाहिजे, आणि सर्वांनी फुललंही पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना आठवत असेलही, मी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हणालो होतो- ‘‘सबका प्रयास’’ – होय! ‘‘ सबका प्रयास’’ सर्वांच्या प्रयत्नांनीच भारत क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन उंची प्राप्त करू शकेल. असा विक्रम निर्माण करण्याचा अधिकारही भारताला आहे. मेजर ध्यानचंद जी यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे. अनेक वर्षांनी देश हा कालखंड पहात आहे, अनुभवत आहे. खेळ याविषयाच्याबाबतीत कुटुंब असो, समाज असो, राज्य असो, राष्ट्र असो – एक मनानं सर्व लोक जोडले जात आहेत.
माझ्या प्रिय नवयुवकांनो,
आपण सर्वांनी या संधीचा लाभ घेवून वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये कौशल्य प्राप्त केलं पाहिजे. गावां-गावांमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं निरंतर आयोजन केलं गेलं पाहिजे. अशा स्पर्धांमधूनच तर खेळाचा विस्तार होत असतो. खेळ विकसित होतो आणि खेळाडूही यामधूनच तयार होतात. चला तर मग, आपण सर्व देशवासीय या क्रीडा क्षेत्राशी निगडित झालेल्या परिवर्तनाला, जितकी चालना देता येईल, जितकं पुढं घेऊन जाता येईल तितकं जावूया. या परिवर्तनामध्येही आपण जितकं योगदान देऊ शकतो, तितकं देवून ‘सबका प्रयास’ हा मंत्र प्रत्यक्षात जगून दाखवू या!
माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या जन्माष्टमीचा सणही आहे. जन्माष्टमीचा काळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. आपल्याला भगवान कृष्णाची सर्व रूपं चांगली ठाऊक आहेत. खोडकर कान्हापासून ते विराट रूप धारण करणा-या कृष्णापर्यंत, त्याच्या शास्त्र सामर्थ्यापासून ते शस्त्र सामर्थ्यापर्यंत! कला असो, सौंदर्य असो, माधुर्य असो, कुठं कुठं कृष्ण असतो. मात्र ही गोष्ट मी करतोय, याला कारण म्हणजे, जन्माष्टमीच्या अगदी काही दिवसच आधी, मी एका आगळ्या-वेगळ्या अनुभवाला सामोरा गेलो. हा अनुभव तुम्हाला सांगावा, असं माझ्या मनात आलंय. तुम्हा सर्वांना आठवत असेल, याच महिन्यात, 20 तारखेला भगवान सोमनाथ मंदिरानं केलेल्या काही विकास कामांचे लोकार्पण केलं गेलं. सोमनाथ मंदिरापासून 3-4 किलोमीटर अंतरावरच भालका तीर्थ नावाचं स्थान आहे. याच स्थानी भगवान श्रीकृष्णानं भूमीवरचे आपले अखेरचे क्षण व्यतीत केले होते. एक प्रकारे भूलोकी भगवंताच्या लीलांची समाप्ती या स्थानावर झाली, असं म्हणता येईल. सोमनाथ न्यासाच्यावतीनं या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं केली आहेत. भालका तीर्थ आणि तिथं होत असलेल्या कामांविषयी मी विचार करत असतानाच माझं लक्ष एका सुंदरशा कलापुस्तकाकडे वेधलं गेलं. हे पुस्तक माझ्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी माझ्यासाठी ठेवून गेलं होतं. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रूपांची अनेक भव्य छायाचित्रे होती. सर्व छायाचित्रे अतिशय मोहक होती. विशेष म्हणजे ती अर्थपूर्णही होती. पुस्तकाची पानं उलटायला मी प्रारंभ केला, या पुस्तकानं पाहता पाहता माझी जिज्ञासा अधिकच जागृत झाली. ज्यावेळी ते पुस्तक पाहिलं आणि त्यातली सर्व छायाचित्रं माझी पाहून झाली, त्यावेळी तिथं शेवटी माझ्यासाठी एक संदेश लिहिलेला असल्याचं दिसलं. तो संदेश वाचल्यानंतर मात्र माझ्या मनात ते पुस्तक घ्यावं, असा विचार आला. आणि जो कोणी हे पुस्तक माझ्या निवासस्थानाबाहेर ठेवून गेला आहे, त्या व्यक्तीला आपण भेटलंच पाहिजे, असंही माझ्या मनाला वाटायला लागलं. मी इच्छा व्यक्त केल्यानंतर आमच्या कार्यालयाकडून त्या व्यक्तीशी संपर्क साधला गेला आणि दुस-याच दिवशी त्या व्यक्तीला बोलावण्यात आलं. श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या रूपांना दर्शवणारा तो कलाग्रंथ पाहताना माझ्या मनात जी जिज्ञासा जागृत झाली होती, त्याच जिज्ञासेमुळे मला त्या ग्रंथाचा जनक- जदुरानी दासी जी यांना भेटण्याची इच्छा होती. त्या अमेरिकी आहेत. दासी जी यांचा जन्म अमेरिकेतला. त्यांचं पालन-पोषणही अमेरिकेत झालंय. जदुरानी दासी जी ‘इस्कॉन’बरोबर जोडल्या गेल्या आहेत. हरे कृष्णा चळवळीशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्याविषयी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भक्ती कलेमध्ये निपुण आहेत. तुम्हाला माहितीच असेल, आता दोन दिवसांनीच म्हणजे, एक सप्टेंबरला इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद स्वामी जी यांची 125 वी जयंती आहे. जदुरानी दासी जी यासंबंधीच्या कार्यासाठीच भारतात आल्या होत्या. माझ्या मनामध्ये एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला. ज्यांच्या जन्म अमेरिकेत झाला आहे, जी व्यक्ती भारतीय भाव, भारतीय मानस यांच्यापासून वास्तविक खूपच दूर आहे, तरीही त्या व्यक्तीनं भगवान श्रीकृष्णाची इतकी मनमोहक चित्र कशी काय बनवली असतील? मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो. आमच्या चर्चेतला काही भाग तुम्हा मंडळींनीही ऐकावा, असं मला वाटतंय.
पंतप्रधान – जदुरानी जी, हरे कृष्ण!
भक्ती कला या विषयी मी थोडंफार वाचलं आहे, पण आमच्या श्रोत्यांना तुम्ही याविषयी आणखी थोडं सांगावं. भक्ती कलेविषयी तुम्हाला असलेली मनापासून आवड, त्यामधला रस हे सगळंच महान वाटतंय.
जदुरानी जी – भक्ती कला याविषयी मी एक लेखच लिहिला आहे. या कलेविषयी तपशीलात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की, ही कला काही मनातून किंवा कल्पनेतून साकारली जात नाही. परंतु याविषयी ब्रह्म संहितेसारख्या प्राचीन वेदिक शास्त्रातून ही भक्ती कला आली आहे, हे समजतं. ‘‘वें ओंकाराय पतितं स्क्लितं सिकंद. तसंच वृंदावनच्या गोस्वामींना प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी ही कला दिली आहे, असं मानतात.
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्द विग्रहः
देव बासुरी कशा पद्धतीनं वाजवायचे, कशी वागवायचे, त्यांची सर्व इंद्रियं कशा पद्धतीनं कार्यरत असायची आणि श्रीमद् भागवत यांची माहिती, त्यामध्ये आहे.
बर्हापींड नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं… असं अगदी सर्वकाही म्हणजे, ईश्वर आपल्या कानावर फूल कसं लावायचे, त्यामागे अर्थ काय होता, त्यांनी आपल्या पदकमलांचे ठसे वृंदावनाच्या भूमीवर कसे उमटवले, गोमाता त्यांच्या नादमाधुर्यानं कशा मंत्रमुग्ध होत असत, कान्हाच्या बासुरीनं सर्वांना कसं मोहित केलं होतं, सर्वांच्या हृदयामध्ये, मनामध्ये कशा पद्धतीनं कृष्णाचा वास असतो … हे सगळं सगळं काही आपल्या प्राचीन वेदिक शास्त्रात नमूद केलं आहे. आणि ही सगळी शक्ती अतींद्रिय जागृत असलेल्या व्यक्तींकडून आली आहे. अगदी सच्च्या भक्तांना ही कला अवगत झाली. ही काही माझ्यातल्या कलेची जादू नाही. तर कायाकल्प घडवणारी शक्ती आहे.
पंतप्रधान – मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. 1966 पासून तुमचा हा प्रवास सुरू आहे आणि 1976 मध्ये तुम्ही भारताशी प्रत्यक्ष जोडल्या गेल्या आहात. या दीर्घकाळाच्या अनुभवानंतर भारताचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, असं तुम्हाला वाटतं?
जदुरानी जी – पंतप्रधान जी, भारत माझ्यासाठी सर्वकाही, सर्वस्व आहे. काही दिवसांपूर्वीच मी माननीय राष्ट्रपतींना याविषयी बोलताना नमूद केलं असावं. आता भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं खूपच आधुनिक होत आहे. आणि व्टिटर, इन्स्टाग्रॅम यांच्याबाबतीत म्हणायचं झालं तर भारत पश्चिमेचं अनुकरण करत आहे. आयफोन्स आणि मोठमोठ्या इमारती त्याचबरोबर खूप सा-या सुविधाही पश्चिमेसारख्या होत आहेत. परंतु मला पक्कं ठाऊक आहे की, हे काही भारताचं खरं वैभव नाही. या भारतभूमीमध्ये कृष्णासारख्या अवतारी पुरूषानं जन्म घेतला आहे, हेच खरं भारताचं वैभव आहे. विशेष म्हणजे एकच अवतार नाही तर अनेक अवतार या भूमीत अवतरले आहेत. इथं भगवान शिव अवतरले, इथं राम अवतरले, इथं पवित्र नद्या आहेत. वैष्णव संस्कृतीमधली अनेक पवित्र स्थानं इथं आहेत. त्यामुळंच संपूर्ण विश्वाच्या दृष्टीनं भारत विशेषतः वृंदावन हे सर्वात महत्वाचं स्थान आहे. वृंदावन हे संपूर्ण वैकुंठाचं स्त्रोत आहे. व्दारिका म्हणजेच भौतिक निर्मितीचं स्त्रोत आहे. त्यामुळंच मला भारत प्रिय आहे.
पंतप्रधान – जदुरानी जी आभार! हरे कृष्ण!!
मित्रांनो,
दुनियेतले लोक ज्यावेळी आज भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्याविषयी इतका मोठा विचार करतात, तर आपलीही काही जबाबदारी आहे. आपण आपल्या या महान परंपरा अशाच पुढे नेल्या पाहिजेत. ज्या कालबाह्य परंपरा आहेत, त्या तर सोडल्याच पाहिजेत. मात्र ज्या कालातीत आहेत, त्यांना पुढे नेलेच पाहिजे. आपण आपले उत्सव, सण साजरे करताना, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. इतकंच नाही तर प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणता ना कोणता संदेश आहे, कोणता ना कोणता संस्कार आहे. तो आपण जाणून घेतला पाहिजे. आणि तसंच वागलं, जगलंही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या येणा-या पिढीकडे हा संस्कार वारसा म्हणून आपल्याला सोपवायचा आहे. सर्व देशवासियांना मी पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या कोरोना कालखंडामध्ये स्वच्छतेविषयी मला जितकं काही सांगायचं, बोलायचं होतं, ते थोडं कदाचित कमी झालं असावं, असं वाटतंय. स्वच्छता अभियानाकडे आपल्याला जराही दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांतूनच कसा सर्वांचा विकास होऊ शकतो, याचे उदाहरण आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते आणि आपणही असेच काही करावं, यासाठी नवीन चैतन्यही निर्माण करते. नव्यानं विश्वास येतो. आणि हा विश्वासच आपल्या संकल्पाला नवसंजीवनी देत असतो. आता स्वच्छता अभियानाविषयी चर्चा सुरू झाली की इंदूरचं नाव घेतलं जातं, हे आपण सर्वजण चांगलंच जाणून आहोत. कारण इंदूरनं स्वच्छतेविषयी स्वतःची एक वेगळी आणि विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल इंदूरचे नागरिक अभिनंदनास पात्र आहेत. आपलं हे इंदूर शहर अनेक वर्षांपासून ‘स्वच्छ भारत क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. शहरानं आपलं पहिला क्रमांक कायम राखला आहे. आता इंदूरचे लोक स्वच्छ भारताच्या या क्रमवारीत पहिले येऊन आनंद मानून शांत बसू इच्छित नाहीत. तर त्यांना आणखी पुढं जायचं आहे. काही तरी नवीन करायचं आहे. आणि त्यांनी आता तसा मनोमन निश्चयही केला आहे. त्यांनी इंदूरला ‘वॉटर प्लस सिटी’ बनवायचं आहे. त्यासाठी इंदूरनिवासी सर्वतोपरी कार्य करत आहेत. ‘वॉटर प्लस सिटी’ याचा अर्थ असे शहर जिथं कोणत्याही प्रक्रियेविना कसल्याही प्रकारचे सांडपाणी कोणत्याही सार्वजनिक स्त्रोतांमध्ये सोडण्यात येणार नाही. इथल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या सांडपाणी वाहिन्या सांडपाणी प्रक्रिया करणा-या प्रकल्पांना जोडल्या आहेत. स्वच्छता अभियानही सुरू ठेवलं आहे. आणि आता या कारणांमुळे सरस्वती आणि कान्ह या नद्यांमध्ये सोडले जाणारे दूषित पाणीही ब-याच प्रमाणात कमी झाले आहे. आता सुधारणा दिसून येत आहेत.
आज आपला देश स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प आपण पूर्णत्वाला न्यायचा आहे. आपल्या देशातील जितकी जास्त शहरे ‘Water Plus City’ असतील, त्याच प्रमाणात स्वच्छतेची व्याप्ती वाढेल, आपल्या नद्या स्वच्छ होतील आणि पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्याचे संस्कारसुद्धा आपसूक होतील.
मित्रहो, बिहारमधील मधुबनी येथील एक उदाहरण माझ्या समोर आले आहे. मधुबनी येथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठ आणि स्थानिक कृषी विज्ञान केंद्राने एकत्रितपणे एक चांगला उपक्रम राबवला आहे. शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळतो आहेच आणि त्याच बरोबर स्वच्छ भारत मोहिमेला सुद्धा चालना मिळते आहे. विद्यापीठाच्या या उपक्रमाचे नाव आहे “सुखेत मॉडेल”. गावातले प्रदूषण कमी करणे हा या “सुखेत मॉडेल” चा उद्देश आहे. या मॉडेल अंतर्गत गावातल्या शेतकऱ्यांकडून शेण आणि शेतातला तसेच घरातला इतर कचरा गोळा केला जातो आणि त्याच्या मोबदल्यात गावकऱ्यांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी पैसे दिले जातात. गावातून जो कचरा गोळा केला जातो, त्यातून गांडूळ खत तयार केले जाते. म्हणजेच या “सुखेत मॉडेल” चे चार लाभ अगदी सहज दिसून येतात. एक तर गाव प्रदूषण मुक्त होते, दुसरे म्हणजे गाव घाणीपासून, कचऱ्यापासून मुक्त होते, तिसरे म्हणजे ग्रामस्थांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर साठी पैसे मिळतात आणि चौथा लाभ म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांना जैविक खत उपलब्ध होतं. विचार करा, अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला नक्कीच सक्षम करू शकतो. हीच खरी आत्मनिर्भरता आहे. देशातल्या प्रत्येक पंचायतीला मी आवाहन करतो की अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत तुम्ही नक्की विचार करा. आणि मित्रहो, जेव्हा आपण एखादे लक्ष्य निर्धारित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा आपल्याला त्याचे फळ मिळतेच. तामिळनाडूमधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या कांजीरंगाल पंचायतीचे उदाहरण बघा ना.या लहानशा ग्रामपंचायतीने काय केले ठाऊक आहे का..? या ठिकाणी तुम्हाला ‘वेल्थ फ्रॉम वेस्ट’ चा एक अनोखा उपक्रम बघता येईल. इथल्या ग्रामपंचायतीने स्थानिक लोकांच्या मदतीने कचऱ्यापासून वीज तयार करण्याचा एक स्थानिक प्रकल्प आपल्या गावात सुरू केला आहे. सगळ्या गावातल्या कचरा एकत्र केला जातो, त्यापासून वीज तयार केली जाते आणि उर्वरित उत्पादनाची विक्री कीटकनाशक म्हणून केली जाते. गावातल्या या ऊर्जा प्रकल्पात प्रतिदिन दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून मिळणाऱ्या विजेचा वापर, गावातले पथदिवे आणि इतर गरजा भागवण्यासाठी केला जातो. या प्रकल्पामुळे पंचायतीच्या पैशांची बचत होते आहे आणि त्याचबरोबर तो पैसा विकासाच्या इतर कामी वापरला जातो आहे. आता मला सांगा, तमिळनाडू मधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या एका लहानशा पंचायतीने आपणा सर्व देशवासियांना काही नवे करण्याची प्रेरणा दिली आहे की नाही? त्यांनी खरोखरच कमाल करून दाखवली आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मन की बात कार्यक्रम आता भारताच्या सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात मन की बात कार्यक्रमावर चर्चा केली जाते. परदेशात राहणारे आपल्या भारतीय समुदायाचे लोकसुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती देत असतात. आपल्या या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून मलासुद्धा परदेशात सुरू असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल माहिती द्यायला मनापासून आवडते. आज सुद्धा मी तुमची ओळख अशाच काही लोकांशी करून देणार आहे. मात्र त्यापूर्वी मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवू इच्छितो. जरा लक्षपूर्वक ऐका.
##
[रेडियो युनिटी 90 एफ्.एम्.-2]
नमोनमः सर्वेभ्यः | मम नाम गङ्गा | भवन्तः शृण्वन्तु रेडियो-युनिटी-नवति-एफ्.एम् –‘एकभारतं श्रेष्ठ-भारतम्’ | अहम् एकतामूर्तेः मार्गदर्शिका एवं रेडियो-युनिटी-माध्यमे आर्.जे. अस्मि | अद्य संस्कृतदिनम् अस्ति | सर्वेभ्यः बहव्यः शुभकामनाः सन्ति| सरदार-वल्लभभाई-पटेलमहोदयः ‘लौहपुरुषः’ इत्युच्यते | २०१३-तमे वर्षे लौहसंग्रहस्य अभियानम् प्रारब्धम् | १३४-टन-परिमितस्य लौहस्य गलनं कृतम् | झारखण्डस्य एकः कृषकः मुद्गरस्य दानं कृतवान् | भवन्तः शृण्वन्तु रेडियो-युनिटी-नवति-एफ्.एम् –‘एकभारतं श्रेष्ठ-भारतम्’ |
[रेडियो युनिटी 90 एफ्.एम्.-2]
##
मित्रहो, ही भाषा तुम्ही नक्कीच ओळखली असेल. रेडिओवर संस्कृत भाषेत संवाद सुरू आहे आणि हा संवाद साधणाऱ्या आहेत आर जे गंगा. आर जे गंगा या गुजरातच्या रेडिओ जॉकी गटातल्या एक सदस्य आहेत. आर जे नीलम, आर जे गुरु आणि आर जे हेतल हे त्यांचे आणखी काही सहकारी आहेत. हे सर्वजण गुजरात मध्ये केवडिया इथे संस्कृत भाषेच्या सन्मानात भर घालायचे मोलाचे काम करत आहेत. केवडीया म्हणजे असे ठिकाण जिथे आपल्या देशाचा मानबिंदू असणारा जगातला सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा आहे. त्या केवडिया बद्दल मी बोलतो आहे. हे सर्व रेडिओ जॉकी एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात. ते मार्गदर्शक म्हणून सेवा देतात आणि त्याच बरोबर कम्युनिटी रेडिओ इनिशिएटिव्ह रेडिओ युनिटी 90 एफ एम सुद्धा चालवतात. हे आर जे आपल्या श्रोत्यांसोबत संस्कृत भाषेत संवाद साधतात आणि संस्कृत भाषेतच माहिती सुद्धा देत असतात.
मित्रहो, आपल्याकडे संस्कृत बद्दल,
अमृतम् संस्कृतम् मित्र, सरसम् सरलम् वचः |
एकता मूलकम् राष्ट्रे, ज्ञान विज्ञान पोषकम् |
,असे म्हटले जाते.
अर्थात आपली संस्कृत भाषा सरस सुद्धा आहे आणि सरळ अर्थात सोपी सुद्धा आहे.
संस्कृत भाषा आपल्या विचारांच्या आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून ज्ञान,विज्ञान आणि राष्ट्राच्या एकतेचं पोषण करते, सक्षमीकरण करते. संस्कृत साहित्यातील मानवतेचे आणि ज्ञानाचे दिव्य दर्शन कोणालाही आकर्षित करू शकते. परदेशात संस्कृत शिकवण्याचे प्रेरक कार्य करणाऱ्या काही लोकांबद्दल मला नुकतीच माहिती मिळाली. आयर्लंडमध्ये राहणारे श्रीयुत रटगर कोर्टेनहॉर्स्ट संस्कृतचे विद्वान आणि शिक्षक आहेतआणि ते तिथल्या मुलांना संस्कृत भाषा शिकवतात. आपल्याकडे पूर्वेला भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध सक्षम करण्यात संस्कृत भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. चिरापत प्रपंडविद्या आणि डॉ. कुसुमा रक्षामणी थायलंडमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांनी थाई आणि संस्कृत भाषेत तुलनात्मक साहित्याची रचना सुद्धा केली आहे. असेच आणखी एक प्रोफेसर आहेत श्रीयुत बोरीस जाखरीन. ते रशियामध्ये मॉस्को स्टेट विद्यापीठात संस्कृत शिकवतात. त्यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचा रशियन भाषेत अनुवाद सुद्धा केला आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकवणार्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी संस्कृत स्कूलचा समावेश होतो. या सर्व संस्था मुलांसाठी संस्कृत व्याकरण शिबिरे, संस्कृत नाटक आणि संस्कृत दिवस अशा उपक्रमांचे आयोजन सुद्धा करत असतात.
मित्रहो, अलीकडच्या काळात संस्कृत भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. आता आपणही त्यासाठी योगदान देण्याची वेळ आली आहे. आपला वारसा जोपासणे, सांभाळणे आणि नव्या पिढीकडे सोपवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि भावी पिढीचा तो अधिकार आहे. या कामांसाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची आता गरज आहे. मित्रहो, अशाप्रकारचे प्रयत्न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल, अशा एखाद्या व्यक्तीची माहिती तुमच्याकडे असेल तर #celebratingSanskrit सह सोशल मीडिया वर अशा व्यक्तीशी संबंधित माहिती नक्की शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण लवकरच विश्वकर्मा जयंती साजरी करू. भगवान विश्वकर्मा यांना आपल्याकडे विश्वाच्या सृजनशक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या हाती असणार्या कौशल्यातून एखाद्या वस्तूची निर्मिती करणे, सृजन करणे, मग ते शिवणकाम किंवा विणकाम असो, सॉफ्टवेअर असो किंवा उपग्रहाशी संबंधित काम असो, या सर्वच कृतींमधून भगवान विश्वकर्मांचे अस्तित्व प्रतीत होत असते. जगात आज कौशल्यांचा उदोउदो केला जातो आहे. आपल्या ऋषी-मुनींनी मात्र हजारो वर्षांपूर्वीच कौशल्ये आणि प्रमाण या बाबींवर भर दिला होता. त्यांनी कौशल्ये आणि आस्था यांची सांगड घातली आणि कौशल्यांचा वापर हा आपल्या जगण्याचाच एक भाग झाला. आपल्या वेदांनीसुद्धा अनेक सूक्ते भगवान विश्वकर्मा यांना समर्पित केली आहेत. निसर्गातील कितीही मोठी रचना असो, जगात जी काही नवी आणि मोठी कामे झाली आहेत, त्या सर्वांचे श्रेय आपल्या शास्त्रांनी भगवान विश्वकर्मा यांनाच दिले आहे. जगात विकास आणि नाविन्याशी संबंधित जी काही कामे होतात, ती कौशल्यांच्याच माध्यमातून होतात, हे यावरून दिसून येते. भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती आणि पुजेमागे हीच भावना आहे. आपल्या शास्त्रात म्हटले आहे,
विश्वम कृत सन्म कर्मव्यापारः यस्य सः विश्वकर्मा |
अर्थात सृष्टी आणि निर्मितीशी संबंधित सर्व कामे जो करतो, तो विश्वकर्मा आहे. आपल्या शास्त्रांच्या मते, आपल्या अवतीभवती निर्मिती आणि सृजनात गुंतलेले जे कुशल लोक आहेत, ते सगळेच भगवान विश्वकर्मा यांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही. विचार करून बघा. तुमच्या घरी विजेशी संबंधित काही अडचणी उद्भवल्या आहेत आणि त्या दुरुस्त करणारा भेटला नाही, तर काय होईल? तुम्ही किती त्रासून जाल. अशा अनेक कौशल्यपूर्ण लोकांमुळे आपले जगणे सुसह्य होत राहिले आहे. जरा आपल्या आजूबाजूला नजर टाका. लोहारकाम करणारे, मातीपासून भांडी तयार करणारे, लाकडी सामान तयार करणारे, विजेचे काम करणारे, घरात रंगकाम करणारे, स्वच्छता कर्मचारी किंवा मोबाईल लॅपटॉप दुरुस्त करणारे हे सर्वच घटक, आपल्या कौशल्यामुळे ओळखले जातात. हे सुद्धा आधुनिक विश्वकर्माच आहेत. मित्रहो, काळजी करण्यासारखा आणखी एक मुद्दा आहे. ज्या देशात, जिथल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये, विचारांमध्ये, कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाची सांगड भगवान विश्वकर्मा यांच्याशी घालण्यात आली आहे, तिथली परिस्थिती बदलत गेल्याचे दिसून आले आहे. आपले कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, तसेच राष्ट्रीय जीवनावर कौशल्यांचा फार मोठा प्रभाव एके काळी होता. मात्र गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात कौशल्यांकडे आदराने पाहण्याची भावना हळूहळू विस्मृतीत गेली. कौशल्यांवर आधारित कामांकडे तुच्छ भावनेने पाहिले जाऊ लागले. आणि आज बघा, अवघे जग कौशल्यांवरच भर देते आहे. भगवान विश्वकर्मा यांची पूजा निव्वळ औपचारिकता नाही. आपण कौशल्यांबाबत आदराची भावना बाळगली पाहिजे, कौशल्ये प्राप्त करण्यासाठी कष्ट केले पाहिजेत.आपल्या हाती कौशल्ये असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. जेव्हा आपण काही नवे करू, नावीन्यपूर्ण करू, ज्यामुळे समाजाचे हित होईल, लोकांचे जगणे सोपे होईल, तेव्हा आपली विश्वकर्मा पूजा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. अंगी कौशल्ये असणाऱ्या लोकांसाठी आज जगात अनेक संधी उपलब्ध आहेत. अंगी कौशल्ये असणाऱ्यांसाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. चला तर मग, यावेळी आपण भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनिमित्त आस्थेच्या बरोबरीने त्यांचा संदेशही अंगीकारण्याचा संकल्प करूया. कौशल्यांचे महत्त्व ओळखू या, अंगी कौशल्य असणाऱ्या सर्वांना, कोणतेही काम कौशल्याने करणाऱ्या सर्वांना आदराची वागणूक देऊ, असा संकल्प आपण करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीचे हे 75 वे वर्ष आहे. या वर्षभरात आपण रोजच नवा संकल्प करायचा आहे, नवा विचार करायचा आहे आणि काही नवे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला भारत लवकरच स्वातंत्र्यप्राप्तीची शंभर वर्षे पूर्ण करणार आहे. आपण आज केलेले संकल्प, हे तेव्हाच्या यशाची पायाभरणी करणारे ठरणार आहेत. हे लक्षात ठेवून आपण या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. यासाठी आपण जास्तीत जास्त योगदान द्यायचे आहे. हे प्रयत्न करताना आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे, दवाई भी, कडाई भी. देशभरात 62 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. मात्र तरीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचे आहे. आणि हो, नेहमीप्रमाणे जेव्हा तुम्ही काही नवे कराल, नवा विचार कराल, तेव्हा मलाही विश्वासात घ्या, मलाही त्याबद्दल सांगा. तुमच्या पत्रांची आणि संदेशाची मी वाट बघतो आहे. तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. मनापासून आभार.
नमस्कार.