राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडील कोविड-19 लसीच्या मात्रांच्या उपलब्धतेविषयीची अद्ययावत माहिती
नवी दिल्ली
संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसीच्या अधिक मात्रा उपलब्ध करून देणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे यासाठी त्यांच्याकरिता उपलब्ध असलेल्या लसीच्या मात्रांची आगाऊ स्वरुपात माहिती पुरविणे आणि लस पुरवठा साखळीचे प्रवाहित मार्गीकरण करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात येत आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा मोफत पुरवठा करून त्यांना मदत करीत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस निर्मात्यांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75म साठ्याची खरेदी करून त्याचा (मोफत) पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करणार आहे.
भारत सरकारकडून राज्यांकडून थेट खरेदी या मार्गाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 58 कोटी 7 लाखांहून अधिक (58,07,64,210) मात्रांचा पुरवठा(विनामूल्य पुरवठा मार्गाने)करण्यात आला आहे आणि आणखी 51,48,970 मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 3 कोटी 62 लाखांहून अधिक (3,62,24,601) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.