सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू, नारायण राणेंच्या यात्रेसमोर प्रश्चचिन्ह
सिंधुदुर्ग,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राणेंना अटक झाली. तर सध्या राणे जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान, या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजपमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीएफची पोलीस कुमकही मागवण्यात आली आहे. तर राणेंना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसा आदेशही जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, मनाई आदेशामुळे राणेंच्या यात्रेसमोर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. 7 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये राणेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली गेली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राणेंच्या अटकेसाठी आंदोलने सुरू केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले व शिवसेनेने आंदोलने सुरू केली. त्यानंतर राणेंना संगमेश्वर येथे रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपने आंदोलन सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध संघर्ष करून वाद निर्माण होऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या जादा पोलीस कुमकही बंदोबस्तासाठो तैनात करण्यात येत आहेत. तर मुंबई पोलीस अधिनियमा प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊन जमाव करता येणार नाही. सभा, मिरवणुका काढता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला जिल्ह्यातील परिस्थिती पाहूनच परवानगी दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यानुसार जिल्ह्यांतील संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37(1) (अ) ते (फ) आणि 37(3) प्रमाणे काल 24 ऑॅगस्ट 2021 सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर 2021 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. या काळात सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्ये वाजवणे, जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे यावर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे राणेंच्या यात्रेसमोर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे.