अनिल परबांची ’ती’ क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

मुंबई,

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल (24 ऑॅगस्ट 2021) रत्नागिरीत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना महाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीनावर सुटका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राणेंवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आता एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच या व्हायरल होत असलेल्या क्लिपमुळे अनिल परब अडचणीत येण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. एका पत्रकार परिषदेत बसलेले अनिल परब मोबाइल फोनवर बोलत असून त्यात त्यांनी केलेले संभाषण स्पष्टपणे ऐकण्यास मिळत आहे. या व्हिडीओ क्लिपच्या आधारे भारतीय जनता पक्षाने अनिल परबांवर आरोप केला आहे की, राणेंच्या अटकेसाठी परबांनी पोलिसांवर दबाव आणला आहे.

व्हायरल झालेल्या या क्लिपवरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणार्‍या अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी गाणी भातखळकर यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललं आहे. सगळं ड्राफ्टिंग झालंय, लवकरच अनिल परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी क्लिप राज्याने पाहिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!