राणे यांना दुसरा धक्का; नाशिक पोलिसांकडून नोटीस, या तारखेला हजर राहण्याचे आदेश

नाशिक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. महाड न्यायालयाकडून जामीन मिळताच नारायण राणे यांना दुसरा धक्का बसला आहे. नाशिक पोलिसांकडून राणे यांना नोटीस बजवण्यात आली आहे. 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आजच सुनावणीची शक्यता आहे.

राणे यांना अटक करणे हा हेतू नाही फक्त वक्तव्याची पुनरावृत्ती होऊ नये ही अपेक्षा. त्यांना नोटीस बाजावण्याची कारवाई झालेली आहे. त्यांनी बॉण्ड लिहून दिलेला आहे ते अपेक्षित होते. आमच्या केसमध्ये 2 तारखेला येण्याचे समन्स दिले आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली. ते म्हणाले अटकेच्या आदेशात बदल करण्यात आले आहेत आणि केवळ नोटीस बाजवण्यात आली आहे. भारताच्या संविधानात राष्ट्रपती आणि राज्यपाल सोडून कुणी व्यक्ती कितीही मोठा असेल त्याला अटक केली जाऊ शकते, मी रुल ऑॅफ लॉ फॉलो करतो, असे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणाले.

नारायण राणे यांच्यावर पुणे, नाशिक, ठाणे, महाडमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिकहून चिपळूणकडे पोलिसांची टीम निघाली होती. मात्र, रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन महाड पोलिसांच्या ताब्यात राणे यांना दिले. त्यानंतर त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. त्याचवेळी काही अटी लागू केल्या आहेत. त्यानुसार दोन वेळा जिल्हा पोलीस कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच कोणावर दबाब आणू नये आणि पुरावे नष्ट करु नये, असे स्पष्ट न्यायालयाने बजावले आहे.

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई गाठली. महाड न्यायालयात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणेही होत्या. भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आलीय. राणेंसह भाजपचे सगळे नेते मुंबईत परतलेत.

दरम्यान, नारायण राणे यांची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा राणेंची प्रकृती सुधारल्यावर सुरू केली जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ज्या ठिकाणांहून राणेंना काल अटक केली होती. त्याच ठिकाणापासून जनआशीर्वाद यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग पोलिसांनी जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू केल्यानं नारायण राणे परत कायदा मोडून सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रवेश करत यात्रा काढणार का, असा प्रश्न आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!