मोठी बातमी: टीम इंडियाच्या कोचपदासाठी शास्त्रीच्या शिष्याचं नाव आघाडीवर
मुंबई,
टीम इंडियाचा पुढील हेड कोच कोण होणार? याची उत्सुकता वाढत आहे. विद्यमान हेड कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. शास्त्री आता हा पदभार वाढून घेण्यासाठी उत्सुक नाहीत. या पदाचा प्रबळ दावेदार असलेल्या राहुल द्रविडनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदासाठी अर्ज केलाय. त्यामुळे त्याचं नावही या शर्यतीमधून बाहेर पडलं आहे. आता भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचसाठी आणखी एक नवं नाव पुढं आलं आहे.
टीम इंडियाचे विद्यमान बॅटींग कोच विक्रम राठोड यांचं नाव या पदासाठी सध्या आघाडीवर आहे. विक्रम राठोड हा विद्यमान कोच रवी शास्त्री यांच्या जवळचा असून त्यांचे कॅप्टन विराट कोहलीसोबतही चांगले जुळते त्याचबरोबर राठोड यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं ऑॅस्ट्रेलियामध्ये भारतानं टेस्ट सीरिज जिंकली आहे. ॠषभ पंत, रोहित शर्मा यांच्या बॅटींगमधील सुधारणेचं श्रेय देखील राठोडचं असून इंग्लंड दौर्यात तर चक्क जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली बॅटींग केली आहे.
विक्रम राठोड यांनी 1996-97 च्या काळात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं सहा टेस्ट आणि सात आंतरराष्ट्रीय वन-डे सामने खेळले आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द लहान असली तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते यशस्वी होते. त्यांनी 146 मॅचमध्ये 49.66 च्या सरासरीनं 11473 रन केले आहेत. तर अ श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 99 सामन्यात जवळपास 3000 रन केले आहेत.
टीम इंडियाचा स्तर उंचावण्यासाठी तसंच जागतिक पातळीवर टीमला अजिंक्य बनवण्यासाठी काही बदलांची गरज असल्याचं बीसीसीआयचं मत आहे. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यानंतर नियामानुसार बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवेल. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. लॉर्ड टेस्टच्या दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शास्त्रीसोबत या विषयावर चर्चा केल्याचंही वृत्त आहे.