विराट कोहलीच्या बॅटमधून शतक येणार, प्रशिक्षकाचा विश्वास

मुंबई,

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. उभय संघातील दोन सामने पार पडले असून यात भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. लॉर्डस् येथे पार पडलेला सामना भारताने 151 धावांनी जिंकला. दरम्यान, अद्याप भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मोठी खेळी करता आलेली नाही. तो सतत अपयशी ठरत आहे. यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. अशात विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराटचे समर्थन करत तो लवकरच मोठी खेळी करेल, असा विश्वास बोलून दाखवला.

राजकुमार शर्मा म्हणाले की, ’विराटला प्रेरित करण्याची गरज नाही. कारण तो आधीच प्रेरित झालेला खेळाडू आहे. मी त्याला मागील सामन्यात फलंदाजी करताना पाहिलं. तेव्हा खूपच उत्साहित होता. संघ जिंकला तेव्हा तो आपल्या खेळीबद्दल चिंता करत नाही. पण जेव्हा तो अशा अ‍ॅटीट्यूडमध्ये असतो तेव्हा त्याच्या बॅटमधून मोठं शतक येणार असतो.’

विराट कोहलीसाठी जो रुटचा पाठलाग करणे एक आव्हान आहे. पण तो आव्हान पसंत करतो. याची मला कल्पना आहे. कारण मी त्याला लहानपणापासून जाणतो. ही चांगली बाब आहे की, येणार्‍या सामन्यात चांगला खेळ पाहण्यास मिळेल, अशी आशा देखील राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. राजकुमार शर्मा यांनी दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, विराट कोहलीला नोव्हेंबर 2019 नंतर आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यातील तीन डावात फक्त 62 धावा केल्या आहेत. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने चार डावात 386 धावा केल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!