पैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या, सोलापुरातील शेळगी परिसरातील घटना

सोलापूर,

पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडलीय. शेळगी येथील मित्र नगर परिसरात राहणार्‍या वंदना कोळेकर यांची हत्या त्यांचा मुलगा अतुल यानेच केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अतुल याला दारूचे व्यसन होते. अतुल याने आई वंदना एकनाथ कोळेकर हिच्याकडे पैशाची मागणी केले होती. आईने पैसे न दिल्याच्या रागातून अतुल याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज आहे.

फिर्यादी राजकुमार कलावंत हे मृत महिलेच्या घरातच भाड्याने रहात होते. यावेळी रात्री त्यांनी वंदना कोळेकर आणि मुलगा अतुल कोळेकर दोघे मोठ्याने भांडत असल्याचा आवाज ऐकला. यावेळी फिर्यादीने वर जाऊन पाहिलं त्यावेळी आरोपीने आईच्या डोक्यात कुकरीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केलेला होता. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून अजून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!