जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान……..हरकती घेण्याची सुविधा डी.डी.आर कडे पाहिजे
यावल – सुरेश पाटील
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लांबलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम आता कोणत्याही तारखेला जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे, जिल्हा बँक जळगाव निवडणुकीसाठी सहकार विभागासह राजकारण, लोकप्रतिनिधी,इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना मोठा वेग आला आहे,मतदार याद्या पासून सुरु होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सभासद किंवा इच्छुक उमेदवारांना हरकती घेण्यासाठी नाशिक येथे नाशिक विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योती लाठकर यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार असल्याने यात सभासदांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे,त्यामुळे नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी सभासदांच्या हरकती घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक जळगाव यांना अधिकार देण्यात यावे असे जिल्हा बँक सभासदांमध्ये तसेच राजकारणामध्ये बोलले जात आहे.
* संपर्कात राहत नसलेल्या काही आजी-माजी संचालकांचा पत्ता कट होणार ….? *
गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत जिल्हा बँकेचे काही आजी-माजी संचालक हे आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या संपर्कात न राहता त्यांनी शेतकऱ्यांच्या सभासदांच्या अनेक अडी- अडचणी सोडविणे बाबत प्रयत्न न केल्याने तसेच ज्या तालुक्यातील मतदारसंघातून निवडून आले होते त्या ठिकाणी न राहता जिल्ह्याच्या ठिकाणी रहिवास करून आपले सोयीनुसार राजकारण,समाजकारण, वैयक्तिक उद्योग करून आपल्याच मतदारांना डावलले अशा काही आजी,माजी संचालकांचा सर्वपक्षीय नेते मंडळी पद्धतशीरपणे पत्ता कट करणार असल्याचे तसेच जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय नेतेमंडळी बिनविरोध करण्यासाठी यशस्वी होणार का?निवडणुकीत कोणकोणते राजकीय पक्ष कोणाशी युती करून पॅनल तयार करतील?तसेच कोण कोणते राजकीय वरिष्ठ नेते मंडळी आजी,माजी संचालकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतील?आणि कोणत्या उमेदवारास निवडणुकीत पराभूत करण्यासाठी राजकीय षडयंत्र रचतील याकडे यावल तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणासह जिल्हा बँक सभासदांचे लक्ष वेधून आहे.
एका दैनिकात सर्वपक्षीय पॅनलच्या उमेदवारांबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्याने चर्चा सुरू झाली आहे त्यानुसार यावल तालुक्यातील ते इच्छुक उमेदवार खरोखरच शेतकऱ्यांच्या सभासदांच्या संपर्कात होते किंवा नाही?नागरिकांच्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी आपल्या सभासद मतदार शेतकऱ्यांचे फोन/मोबाईल किती वेळा उचलले? यावल तालुक्यात त्यांचा जनसंपर्क किती प्रमाणात होता आणि आहे,निवास कुठे आहे?या बाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.