ठाणे शिधावाटपक्षेत्रात समाविष्ट न झालेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ





मुंबई, दि. २७ :- मुंबई – ठाणे शिधावाटपक्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून २०२१ महिन्याकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई चे कैलास पगारे यांनी दिली.

राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना मे – 2020 ते ऑगस्ट – 2020 या चार महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने  गहू 8/- रुपये प्रती किलो व तांदुळ 12 रुपये  प्रती किलो प्रतीमाह प्रतीव्यक्ती 3 किलो गहू व दोन किलो तांदुळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात आला आहे.

या योजनेतील अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप केशरी या शिधापत्रिकाधारकांना प्रतीमाह प्रतीव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदुळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य जून 2021 करिता गहू 8 रुपये प्रती किलो व तांदुळ 12 रुपये  प्रती किलो या सवलतीच्या दराने वितरण करण्यात येईल.

जे शिधापत्रिकाधारक अन्नधान्याची प्रथम मागणी करतील (FIRST COME FIRST SERVE) त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरण करण्यात येईल. या योजनेतील ज्या अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये या योजनेतील अन्नधान्य शिल्लक आहे त्याच शिधावाटप दुकानातून अन्नधान्य वितरण करण्यात येईल.

केशरी शिधापत्रिकाधारकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन सवलतीच्या दराने मिळणारे उपलब्ध अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!