एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत? ’सोप्पं नसतं काही’ नवीकोरी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी

एक स्त्री दोन पुरुषांसोबत राहते, मग त्यांच्यातील संबंध कसे असेल, ती स्त्री या दोघांबरोबर राहते का? की आणखी काही पर्याय निवडते, याच ’पॉलीअमॉरी’ संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेब सीरिज ’प्लॅनेट मराठी ओटीटी’ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मयुरेश जोशी दिग्दर्शित ’सोप्पं नसतं काही’ या वेब सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

काळ बदलतो तसे समाजाचे आचारविचार बदलतात. जन्माला येणार्‍या प्रत्येक नवीन पिढीसोबत सामाजिक नियमात बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी ’लिव्ह इन रिलेशनशिप’ ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला.

नात्याचा असाच एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे ’पॉलीअमॉरी’. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु ’पॉलीअमॉरी’ संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय असला तरी भारतीयांसाठी हा प्रकार काही नवीन नाही. कारण भारतीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारतात द्रौपदीला पाच नवरे होते. त्यामुळे ही संकल्पना फार आधीपासूनच आपल्याकडे प्रचलित आहे. याच ’पॉलीअमॉरी’ संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेब सीरिज ’प्लॅनेट मराठी ओटीटी’ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

नुकताच ’सोप्पं नसतं काही’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेब सीरीज पाहिल्यावरच मिळतील.

’प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित होणार्‍या ’सोप्पं नसतं काही’ या वेब सीरीजबद्दल ’प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”या वेब सीरिजचा विषय आजपर्यंत मराठीत कधीही हाताळण्यात आलेला नाही. मुळात आपले मराठी प्रेक्षक खूपच चोखंदळ आहेत. नवनवीन विषयांचा ते नेहमीच स्वीकार करतात. त्यामुळे हा एक वेगळा विषयीही ते नक्कीच स्वीकारतील. आपली कला, संस्कृती, साहित्य यांना आधुनिकतेची जोड देत ती सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न ’प्लॅनेट मराठी ओटीटी’, अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या माध्यमातून जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, नाविन्यपूर्ण व दर्जेदार कंटेन्ट देणे, ही आमची जबाबदारी आहे. ’सोप्पं नसतं काही’ हा त्याचाच एक भाग आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देतील याची खात्री आहे.”

’प्लॅनेट मराठी ओटीटी’वर 31 ऑॅगस्टपासून ’सोप्पं नसतं काही’ ही वेबसिरीज प्रेक्षकांना अतिशय अल्प दरात पाहता येईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!