गाफील राहू नका! लसीचं सुरक्षा कवच भेदून 87 हजार जणांना कोरोना
मुंबई प्रतिनिधी
कोरोना महासाथीवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण सुरु असून देशभर लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे.
लसीचे दोन डोस घेतले असतील तरी गाफील राहून चालणार नाही. कारण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत देशात 87 हजाराहून अधिक लोकांना दोन डोस घेवूनही कोरोना झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील 4 6टक्के रुग्ण हे एकट्या केरळमधील आहेत. तर 54 टक्के रुग्ण देशातील इतर भागातील आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढलीय.
केरळमध्ये लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 80 हजार जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या 40 हजार नागरिकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्या 200 नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. पण आतापर्यंत कोणत्याही नवीन व्हेरिएंट किंवा म्युटेशनचा उलगडा झालेला नाही.
देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. देशभरात घटत्या रुग्णसंख्येमुळे दिलासा मिळत असला तरी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादी काँग-ेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही खासदार कोल्हे यांना कोरोना झाला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण झाली, तरी त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होत नाहीत आणि कमी प्रयत्नांत शरीर या विषाणूचा सामना करू शकतं, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.