तर कोकणाची मोहेंजोदाडो किंवा द्वारका होईल!
पोलादपूर प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीचे आंदोलन 2007 पासून कोकणातील पत्रकारांना एकत्र करून उभारण्यासाठी संपूर्ण कोकणातील विविध दैनिकांची पत्रकारिता करताना कोकण विभागीय संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी स्विकारली आणि अगदी 2009 मध्ये ही मागणी मान्य होऊन महामहिम राज्यपाल महोदयांचा भूसंपादनाचा अध्यादेश निघाला. पेण येथे यासंदर्भात विजयी मेळावा झाला आणि त्यानंतर चौपदरीकरण होईल. मात्र, बाधितांचे प्रश्न अधिक असतील, तेदेखील पत्रकारांनी सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आणि येथून कथित पत्रकारनेत्यांनी चौपदरीकरणाचे बाधित हे स्थानिक आणि वृत्तपत्रांचे अनेक वर्षांपासूनचे वाचक असल्याच्या वस्तुस्थितीकडे दूर्लक्ष करून विषयांतर होतंय, असे सांगून चौपदरीकरण करणार्या ठेकेदार कंपनीकडून अंदमान सहकुटूंब निघाले. तिथेच पत्रकारांच्या चौपदरीकरणाच्या मागणीचे दिवाळे निघाले. त्यामुळेच सहजता गमावलेल्या पत्रकारांना आजही पुर आणि भूस्खलनाच्या हानीच्या बातम्यांसाठी रात्रीअपरात्री जागत फिरण्याची सजगता दाखवावी लागत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत बांधकाम विभागासह राज्यकर्त्यांची मानसिकता बदलली नाही तर भविष्यात कोकणाची मोहेंजोदाडो किंवा द्वारका नगरी होण्याची परिस्थिती उदभवू शकणार आहे.
बॅ.ए.आर.अंतुले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री असताना तत्कालीन भुपृष्ठ वाहतूक मंत्री पी. चिदम्बरम यांच्याकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी करताना हा राष्ट्रीय महामार्ग आहे या परिस्थितीत रूंद करण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसारच ‘जसे आहे तसे’ रस्ता रूंदीकरण झालेही होते. 2006 मध्ये पोलादपूर ग्रामीण रूग्णालयासमोरील महामार्गाच्या चढरस्त्यावर झालेल्या अपघातानंतर जीव वाचल्याने स्थानिक पत्रकार म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र पाटील जे बॅ.अंतुले यांचे अनुयायी होते. त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयासमोरील चढरस्ता कमी करून भोवती असलेले महाकाय वृक्षदेखील कापून समोरून येणारी वाहने दृष्टीपथात येईल, इतका सुकर बनविला. यामुळे या अपघातप्रवण क्षेत्रात होणार्या अपघाताचे प्रमाण कायमचेच संपुष्टात आले. यामुळे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी ही बाब अन्य पत्रकारांना सांगून महामार्गावरील अपघातांचे सातत्य थांबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिल्यानंतर तत्कालीन कार्यकारिणी सदस्य तसेच शेकापक्षनेते पंडीतशेठ पाटील यांनी मुखपत्राचे संपादक एस.एम.देशमुख यांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणासाठी आंदोलन उभारण्याची सूचना केली. मात्र, यानंतर आंदोलनाचे यशापयशाची मिमांसा करताना सद्यस्थितीत पेण तालुक्यात महामार्गामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानासोबतच महाड आणि पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण आणि नागरी जनजीवन उदध्वस्त होण्यापर्यंत जो प्रकोप घडला आहे. त्यामागे पत्रकारांनी चौपदरीकरणाच्या आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर चौपदरीकरणाच्या कामामध्ये वेळोवेळी झालेल्या बदलाबाबत केलेले अक्षम्य दूर्लक्ष कारणीभूत ठरल्याचे निश्चित आहे.
बॅ.ए.आर.अंतुले यांनी ‘जसे आहे तसे’ रस्ता रूंदीकरण करण्याचे स्पष्टपणे निर्देश दिले होते आणि त्यानंतर देखील कधीही महामार्गावर पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. याच ‘जसे आहे तसे’ तत्वावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले असते तर महामार्गावरील फ्लायओव्हर बि-ज आणि अंडरपास रोड तसेच कॅटलवॉकसारख्या रस्त्यांचे सद्यस्वरूप पाहता या महामार्गावरील धरणांच्या असे वर्णन या पुलांचे करता येणार आहे. महाबळेश्वर आणि महाड पोलादपूर तालुक्यातील पावसाने एकाच दिवसात हजार मि.मीपेक्षा जास्त बेरीज केली असली तरी पुराच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि संपूर्ण पुरस्थिती अनेक तास विनाकारण लोकवस्त्यांमध्ये कायम राहिली आहे, याकडे दूर्लक्ष करता येणार नाही.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची परिस्थिती फारच चिंताजनक आहे कारण अनेकठिकाणी चौपदरीकरणाचे काम पुर्णत्वाकडे केल्याचा दावा संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून केला गेला आहे. दुसरीकडे, गौणखनिज म्हणून डोंगराची लालमाती भरावासाठी वापरण्याकामी मोठ्या प्रमाणात डोंगराळ जमिनीचे उत्खनन केले गेले आहे. डोंगर उकरण्याची गेल्या काही वर्षांपासूनची अर्थमुव्हर्सची विकृती प्रशासनाने गौण खनिज रॉयल्टी आणि अन्य आमिषांतून जोपासल्याचे वारंवार दिसून आले आहे. एलअॅण्डटी सारख्या ठेकेदार कंपन्यांनी सावित्री नदीपात्रातील दगड गोटे क्रशरद्वारे फोडून खडी आणि ग्रीट तयार केली असताना डोंगर फोडून केलेल्या माती उत्खननाचा भरावही फ्लायओव्हरसारखी रस्त्यावरील धरणं बांधण्यासाठी सर्रास आणि वारेमाप प्रमाणात केला गेला. यावेळीचा पाऊस डोंगरदर्यांमध्ये पडला तरी त्या पावसाचे पाणी लालमातीमिश्रीत होऊनच वाहू लागले असल्याचे दिसून आले. नद्या यंदा लालमातीचे पाणी घेऊनच वाहू लागल्या आहेत. भुपृष्ठाची मोठ्या प्रमाणात झीज होत असताना पुरासोबत ही माती जिथे पुरस्थिती काही तास थांबली त्याठिकाणी स्थिरावली गेली आहे. अनेक शतकांच्या डोंगरांना तडे जात असताना गेल्या काही वर्षांपासून उभारण्यात आलेली महामार्गावरील धरणे सुरक्षित असल्याचे मानणे अतिशय विरोधाभास निर्माण करीत आहे.
राजेवाडी गावाला झालेला धोका वरंध भोर पुणे घाटातून आलेल्या सावित्री काळ नदीच्या संगमावरील पाण्याचा प्रचंड जलौेघ फ्लायओव्हरच्या सांडव्यासदृश्य भागातून वाहून आल्याने झाल्याचे दिसून आले आहे. सर्वच घरे मजबूत असताना या जलौघाने घरे वाहून नेण्याइतपत परिस्थिती उदभवली नाही. मात्र, पूरहानीने कळस गाठला होता. आगामी काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील अवाजवी धरणसदृश्य फ्लायओव्हर रस्ते आणि रिटेनिंग वॉल न बांधताच खंदकासारखे खणलेले अंडरपास रस्ते पूर्ववत करता येणार नसले तरी शक्य तेवढे युटर्न अथवा महामार्गावरील सर्व्हिस रोडसची कनेक्टिव्हीटी करण्याची गरज आहे. नजिकच्या काळात भूसंपादन करूनही रस्त्यासाठी न वापरलेली जमीन आणि भूसंपादन न करताच रस्त्यासाठी वापरलेल्या जमिनीचा शासनाने योग्य तो निर्णय घेण्याची गरज असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अनेक डोंगरांमधून काढलेली माती तसेच डांबराचे अनेक थर असलेले जुने रस्ते खोदण्याने एकीकडे सिमेंटचे रस्ते तडकून फुटत असताना डांबरीरस्त्यांची दुरूस्ती सहजसोपी असल्याकडे दूर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याहस्ते घाईघाईने महामार्गाचे उदघाटन करण्याच्या प्रयत्नात फुटलेला काँक्रीटचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग त्यानंतर आजपर्यंत डांबरीकरणाने वारंवार दुरूस्त होत असल्याचे विस्मरण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियासह राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला झाले असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीत जर ही महामार्गामुळे ठिकठिकाणी तयार झालेली रस्त्यावरची धरणं अशीच राहिली तर दरवर्षी असेच अनर्थ घडतील आणि कोकणातील लोकांना जोडणारा कोकणाची लाईफलाईन म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग कोकणाच्या जिवाशी खेळू लागल्याचे दृश्य सार्वकालिक अन् सार्वत्रिक झाल्यास पेणनंतर महाड, पोलादपूर आणि खेड चिपळूणपर्यंतचा र्हास कोकणाच्या अस्तित्वाच्या खुणा श्रीकृष्णाच्या द्वारका आणि मोहेंजोदडोसारख्या पुसून टाकण्याइतपत तीव्र आहेत.