आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न – डॉ. भारती पवार

नंदूरबार,

आदिवासी समाजाला विकास कामांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात 8 आदिवासी खासदारांना नरेंद्र मोदींनी मंत्री केले असे प्रतिपादन आरोग्य व परिवार कल्याण राज्य मंत्री नामदार भारती पवार यांनी केले. नंदूरबार येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

या वेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, आदिवासी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आ. डॉ अशोक उईके, जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी,बबन चौधरी, शिरीष चौधरी , प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते

त्या पुढे म्हणाल्या की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. केंद्राकडून आलेल्या निधीचा राज्य सरकार तर्फे योग्य वापर होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली केंद्राने 56 कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करून जागतिक विक्रम केला. केंद्राकडून लसीचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला होऊनही लस मिळत नसल्याची खोटी माहिती राज्यातील सत्ताधार्‍यांकडून जनतेला दिली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

यात्रेचे प्रमुख आ. डॉ अशोक उईके यांनी यात्रेच्या पालघर ते नंदूरबार या प्रवासाचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार दिन असल्याने डॉ. पवार यांनी छायाचित्रकार व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

शेलदारी, पिंपळनेर, साक्री, निजामपूर मार्गे नंदूरबार येथे ही यात्रा आल्यानंतर आदिवासी नृत्य व ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. शहराच्या प्रवेशद्वारावर खा. डॉ. हीना गावित, जिल्हा अध्यक्ष विजय गावित यांनी स्वागत केले. डॉ . पवार यांनी हुतात्मा शिरीषकुमार यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही डॉ. पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!