न्या. विद्यासागर कानडे हे राज्याचे नवे लोकायुक्त

मुंबई,

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांची राज्याच्या लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती कानडे यांनी आज (गुरूवार) राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

ऑॅगस्ट 2020पासून पद होते रिक्त –

न्या. एम. एल. तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑॅगस्ट 2020मध्ये संपल्यापासून हे पद रिक्त होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी न्या. कानडे यांच्या नियुक्तीची अधिसूचना केली. त्यानंतर कानडे यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ घेतली. शपथ ग-हण सोहळ्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

1979 साली मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात –

22 जून 1955रोजी जन्मलेल्या न्या. कानडे यांनी सन 1979 साली मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली. न्या. कानडे यांची दिनांक 12 ऑॅक्टोबर 2001 रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. दिनांक 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2015 या कालावधीत व त्यानंतर 15 जानेवारी ते 20 जानेवारी 2016 या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते.

कारकिर्दीत 34 हजार प्रकरणांचा न्यायनिवाडा –

न्या. कानडे यांनी आपल्या कारकिर्दीत 34 हजार प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा केला असून त्यांनी दिलेल्या 1200पेक्षा अधिक निकालांचा विधी अहवालांमध्ये उल्लेख केला गेला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!